बॅनर न्यूज

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप विरूद्ध नाना काटे? मतदारसंघातील ५४ टक्के नागरिकांचा अंदाज

Spread the love
पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात कोणामध्ये लढत होईल याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. ते या मतदारसंघातील सर्वाधिक तगडे उमेदवार म्हणून शंकर जगताप यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शंकर जगताप यांची प्रमुख लढत कोणासोबत होऊ शकते याबाबत “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने १० दिवस ऑनलाईन सर्वेक्षण केले. त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ५४ टक्के नागरिकांनी शंकर जगताप यांची प्रमुख लढत ही माजी नगरसेवक नाना काटे यांच्या विरोधात होऊ शकते, असा अंदाज वर्तविला आहे. त्याखालोखाल माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना २२ टक्के नागरिकांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना २० टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.  
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या ६ लाखांच्यावर गेली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड होती. बेरजेच्या राजकारणात माहीर समजले जाणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराच्या राजकीय इतिहासात पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला प्रथमच सत्ता मिळवून दिली होती. त्यामुळे जगताप आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ हे राजकीय समीकरण घट्ट झालेले आहे. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या होत्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाची राजकीय परंपरा चालविण्यासाठी त्यांचे बंधू व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे सज्ज झाले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप हेच महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित मानले जात आहे. त्यांनी भाजप शहराध्यक्ष म्हणून संघटनेसाठी केलेले काम लक्षवेधी ठरत आहे. पक्षातील नव्या-जुन्या सर्वांना सोबत घेऊन ते शहरात पक्ष बांधणीसाठी झटत आहेत. हे करत असताना त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मजबूत बांधणी केल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी विधानसभा लढणार असल्याचेही जाहीर केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक तगडे उमेदवार म्हणून आजच्या घडीला शंकर जगताप यांच्याकडेच पाहिले जात आहे. ते महायुतीचे उमेदवार म्हणून विधानसभेच्या मैदानात उतरल्यास त्यांचा सामना कोणाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शंकर जगताप यांची प्रमुख लढत कोणासोबत होईल याबाबत नागरिकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने चिंचवड विधानसभा मतदारसंघात ऑनलाईन सर्वेक्षण केले. ७ ते १७ ऑगस्ट असे १० दिवस हे ऑनलाईन सर्वेक्षण केले गेले.
या ऑनलाईन सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील १३ हजार ४६८ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यातील ७ हजार २७२ नागरिकांनी शंकर जगताप यांची प्रमुख लढत माजी नगरसेवक नाना काटे यांच्याशी होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली आहे. म्हणजे ५४ टक्के लोकांनी शंकर जगताप विरुद्ध नाना काटे अशी लढत होईल, असा अंदाज वर्तविली आहे. त्याखालोखाल २ हजार ९६२ म्हणजेच २२ टक्के नागरिकांनी शंकर जगताप यांची प्रमुख लढत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्याविरोधात होण्याचा अंदाज बांधला आहे. तसेच २ हजार ६९३ म्हणजे २० टक्के नागरिकांना शंकर जगताप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यात प्रमुख लढत होईल, असे वाटत आहे. त्याचप्रमाणे अवघ्या ४ टक्के म्हणजे ५४१ लोकांना शंकर जगताप विरुद्ध भाऊसाहेब भोईर यांच्यात लढत होण्याची शक्यता वाटत आहे.
 
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अद्यापपर्यंत कोणताच चेहरा पुढे येताना दिसत नाही. या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघात जगताप कुटुंबाविरोधात विजय मिळविणे सोपे नाही हे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी दिल्यास तगडी फाईट होऊ शकते याचा महाविकास आघाडीकडून अंदाज घेतला जात आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले बहुतांश जण हे पडलेले उमेदवारच आहेत. त्यातीलच एकाला पुन्हा उमेदवारी देऊन महाविकास आघाडी लढत देणार की चिंचवड मतदारसंघात एखादा नवीन राजकीय प्रयोग करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button