बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी नाव ठरले?

बिनविरोध नगरसेवकपदाचा इतिहास रचणारे रवि लांडगे; भाजपचा नैसर्गिक, निष्ठावंत आणि ऐतिहासिक पर्याय ! 

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुला होताच शहराच्या राजकारणात एकच नाव ठामपणे पुढे येत आहे ते म्हणजे भाजपचे दोनवेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून २०१७ आणि २०२६ असे सलग दुसऱ्यांदा रवि लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. निष्ठा, परंपरा, अनुभव आणि जनविश्वास या चारही आघाड्यांवर अव्वल ठरणारे रवि लांडगे हेच महापौरपदासाठी सर्वाधिक सक्षम व स्वाभाविक चेहरा असल्याची भावना पिंपरी-चिंचवडमध्ये शहरभर व्यक्त होत आहे.

रवि लांडगे यांची राजकीय वाटचाल ही संघर्ष, निष्ठा आणि भाजपच्या मूळ विचारसरणीशी नाळ जोडणारी आहे. त्यांचे चुलते कै. अंकुशराव लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष होते. त्यांनी पिंपरी-चिंचवडवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना भाजपला उभारी दिली होती. त्या विपरीत राजकीय परिस्थितीत आणि कठीण काळात कै. अंकुशराव लांडगे यांनी भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणत शहरातील राजकीय गणित बदलण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आजच्या भाजपच्या बळकट पायाभरणीमागे रवि लांडगे यांचे वडील कै. बाबासाहेब लांडगे आणि चुलते कै. अंकुशराव लांडगे यांनी केलेला मोठा राजकीय संघर्ष कारणीभूत आहे. तसेच संपूर्ण लांडगे कुटुंबियांचाही वाटा महत्त्वाचा मानला जातो.

भाजपच्या स्थापनेपासून लांडगे कुटुंबिय पक्षासोबत खंबीरपणे उभे आहेत. हीच निष्ठावंत परंपरा रवि लांडगे यांनी नव्या पिढीपर्यंत नेली आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व अशी त्यांची शहरात ओळख आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येण्याचा ऐतिहासिक पराक्रम रवि लांडगे यांनी केला असून, ते पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव नगरसेवक आहेत. हा बिनविरोध विजय केवळ राजकीय यश नसून, जनतेचा आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विश्वास दर्शवणारा कौल मानला जात आहे. जनतेचा प्रचंड विश्वास, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि पक्षातील स्वीकारार्हता यामुळेच हा ऐतिहासिक योगायोग घडू शकला, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ते प्रभाग क्रमांक ६, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहतमधून एकटेच बिनविरोध निवडून आले नाहीत, तर बिनविरोध नगरसेवक होताच निवडणुकीत पॅनलप्रमुखाची जबाबदारी खांद्यावर घेत या प्रभागातील  भाजपचे इतर तीनही नगरसेवक निवडून आणले आहेत. 

त्यामुळे महापौरपदासाठी आवश्यक असलेला अनुभव, पक्षनिष्ठा, प्रशासनाची जाण आणि जनतेशी थेट नाळ, जनविश्वास या सर्व कसोट्यांवर भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे निर्विवादपणे खरे उतरतात. त्यामुळे “रवि लांडगे हेच पिंपरी-चिंचवडचे पुढील महापौर” अशी चर्चा आता केवळ पक्षापुरती मर्यादित न राहता शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळातही जोर धरू लागली आहे. भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील विविध घटकांमध्ये त्यांचेच नाव प्रकर्षाने व्यक्त होत आहे. रवि लांडगे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला एक अभ्यासू, संयमी आणि सर्वसमावेशक महापौर मिळण्याची अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.भाजपच्या संघर्षमय वाटचालीचा, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि स्वच्छ नेतृत्वाचा सन्मान म्हणून महापौरपदाची माळ नगरसेवक रवि लांडगे यांच्या गळ्यात पडणार का, याकडे आता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्या शहराध्यक्षपदाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्यांना शहरात संघटना आणखी मजबूत करण्यासाठी शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागेल, असे बोलले जात आहे. याशिवाय भाजपकडून तिसऱ्यांदा निवडून आलेले शीतल शिंदे यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. मात्र या सर्वांमध्ये दोनवेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे यांचे नाव प्रबळ मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button