बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी
चिखलीतील एकाने पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर फोन करून दिली ही धमकी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर फोन करून ही धमकी दिली. मंगळवारी दुपारी चार वाजता धमकीचा हा फोन आला होता. त्यानंतर भोसरी पोलीसांनी तांत्रिक तपास करून संबंधिताला ताब्यात घेत चौकशी केली. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने नैराश्येतून ही कृती केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आशिष जमदाडे पाटील (रा. चिखली) असे महापौर रवी लांडगे यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईल नंबरवरून त्याचा शोध घेतला. आशिष हा भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो. त्याने मंगळवारी दुपारी चार वाजता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर फोन केला. महापौर रवी लांडगे यांना मारणार असल्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली.
समाधान हेल्पलाईनवर फोन आलेल्या मोबाईलचे लोकेशन पोलीसांनी तपासले. त्यानंतर आशिष जमदाडे पाटील याला चिखली येथून पोलिसांनी शोधून काढले. त्याला भोसरी पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्याने नैराश्येतून महापौर रवी लांडगे यांना धमकी देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर फोन केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडे आणि तो राहत असलेल्या भागातील लोकांकडे त्याची चौकशी केली. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याने नैराश्येतून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला कडक समज देऊन घरी सोडल्याचे भोसरी पोलीसांनी सांगितले.



