बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडकर प्रामाणिक; अवघ्या दोन महिन्यात तब्बल ३०८ कोटी दिले महापालिकेला

महापालिका म्हणतेय हे पैसे आम्हीच वसूल केले

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जागरूक व सुज्ञ मिळकतधारकांनी अवघ्या ६० दिवसांत ३०८ कोटी रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तब्बल २ लाख ७१ हजार ५०३ पिंपरी-चिंचवडकरांनी ही रक्कम दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रामाणिक करदात्यांनी हा कर भरला असला, तरी महापालिकेचा करसंकलन विभाग मात्र हा पैसा आम्ही वसूल केल्याचा दावा करत आहे. त्यामुळे स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.  

पिंपरी-चिंचवडमध्ये ६ लाख ३० हजार मिळकतधारक आहेत. या मिळकतींना पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत दरवर्षी कर आकारला जातो. यातील २ लाख ७१ हजार ५०३ सुज्ञ व जागरूक मिळकतधारकांनी २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या अवघ्या दोन महिन्यातच महापालिकेच्या तिजोरीत ३०८ कोटी रुपये जमा केले आहेत. महापालिकेने विविध कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन कर भरल्यास महापालिका ५ टक्के सवलत देते. त्यामुळे २ लाख ७१ हजार ५०३ मिळकतधारकांपैकी तब्बल १ लाख ९९ हजार ८०७ नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने महापालिकेकडे पैसे जमा केले आहेत. एकूण २१८ कोटी २९ लाख २९ हजार रुपये महापालिकेला ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. मिळकतधारकांनी हा कर भरला असला तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे करसंकलन विभाग मात्र हा कर आम्हीच वसूल केल्याचा दावा करत आहे. हे म्हणजे स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रकार असल्याचे पिंपरी-चिंचवडकरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांना कर भरता यावे यासाठी १७ झोन कार्यालये आहेत. त्यातील वाकड झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३९ हजार ७५९ प्रामाणिक करदात्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या अवघ्या दोनच महिन्यात महापालिकेकडे कर जमा केला आहे. वाकड आणि आसपासच्या भागातील प्रामाणिक मिळकतधारक दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपये कररुपातून देतात. मात्र या भागातील नागरी समस्या पाहिल्या तर बोंबाबोंब असल्याची स्थिती आहे. वाकड भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांना पाण्यासाठी दरवर्षी स्वतःचेच कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. वाकडमधील दत्त मंदिर रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार करण्यात यावा, अशी मागणी नागरिक गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत. या भागातील नागरिकांनी भरलेला कोट्यवधींचा कर चालतो, मात्र रस्त्याची केलेली मागणी चालत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं, अशी अवस्था झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button