बॅनर न्यूज
भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ११ उमेदवार; महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांच्यातच होणार प्रमुख लढत
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सोमवारी सात जणांनी आपले अर्ज मागे घेतले. आता या मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवार असणार आहेत. त्यातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यातच थेट लढत होणार आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत भोसरी मतदारसंघात एकूण १८ जणांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील १८ पैकी ७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार असतील. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवि लांडगे, परमेश्वर बुरले, रामा ठोके, सुरज गायकवाड, दत्तात्रय जगताप, सुहास वाघमारे, संतोष लांडगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे, बहुजन समाज पार्टीचे बलराज कटके, अमजद खान, जावेद शहा, अरुण पवार, कुतुबुद्दीन होबळे, गोविंद चुणचुने, हरीश डोळस, रफिक कुरेशी, शलाका कोंडावार हे ११ उमेदवार भोसरी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उरले आहेत. यातील महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांच्यातच थेट लढत होणार आहे.