बॅनर न्यूज
चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवार; शंकर जगताप, राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर यांच्यात तिरंगी लढत होणार
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सोमवारी सात उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार उरले आहेत. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर अशी तिरंगी लढत होणार आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत चिंचवड मतदारसंघासाठी एकूण २८ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. सात उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. या मुदतीत अरुण पवार, संदीप चिंचवडे, शिवाजी पाडुळे, सीमा यादव, जितेंद्र मोटे, नाना काटे, भरत महानवर यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणूक रिंगणात एकूण २१ उमेदवार असणार आहेत.
त्यामध्ये शंकर जगताप, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गायकवाड, मारूती भापकर, रफीक कुरेशी, सतिश काळे, सिध्दीक शेख, अतुल समर्थ, ॲड. अनिल सोनवणे, करण गाडे, जावेद शेख, धर्मराज बनसोडे, मयुर घोडके, रविंद्र पारधे, राजेंद्र पवार, राजेंद्र काटे, रुपेश शिंदे, विनायक ओव्हाळ, सचिन सिद्धे, सचिन सोनकांबळे यांचा समावेश आहे.