बॅनर न्यूज
सीमा सावळे तेव्हा तुमचे संस्कार कुठे गेले होते?; छायाताई सरवदे यांचा हल्लाबोल
पिंपरी : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पिंपरी-चिंचवडमधील एका न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवर आयोजित चर्चासत्रात माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि तिने मुलावर केलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच सीमा सावळे यांनी पिंपरी एमआयडीसीतील एका वॉशिंग सेंटर चालकाला बेदम मारहाण करून सेंटर बंद करण्याची धमकी दिली होती. सावळे यांचे गुरू सारंग कामतेकर याच्या मुलाची गाडी व्हॅक्युम करून दिली नव्हती एवढे क्षुल्लक कारण त्या मारहाणीमागे होते. आता पुण्यातील अपघात प्रकरणात एका आईच्या संस्कारावर बोलणाऱ्या सीमा सावळे यांनी वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण करताना स्वतःचे संस्कार कुठे ठेवले होते?, असा सवाल भोसरी, बालाजीनगर येथील अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा छायाताई सरवदे यांनी केला आहे. सीमा सावळे म्हणजे “स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून” अशा मनोवृत्तीच्या आहेत. अनैतिक वागणारेच आज आपल्या समाजाला नैतिकता शिकवण्याचा ढोंगीपणा करत आहेत, असा हल्लाबोल छायाताई सरवदे यांनी केला आहे.
पुण्यात कल्याणीनगर येथे १९ मे रोजी कोट्यवधींची किंमत असलेल्या महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला. बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मस्तवाल अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत ही कार भरधाव चालवून दोघांचा जीव घेतला. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा एक झाल्याचे समोर आले. त्यामुळेच या अपघात प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली. पिंपरी-चिंचवडमधील एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवर या अपघाताच्या प्रकरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात भाजपच्या माजी नगरसेविका व पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या देखील सहभागी झाल्या होत्या. या चर्चासत्रात बोलताना सीमा सावळे यांनी पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तिने मुलावर केलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात शिवानी अग्रवाल चुकल्या आहेत, असे सावळे यांनी सांगितले.
त्यावरून भोसरी, बालाजीनगर येथील अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा छायाताई सरवदे यांनी संस्कारावर बोलण्याची तुमची पात्रता आहे का?, असा सवाल सीमा सावळे यांना केला आहे. मार्च २०२३ मध्ये पिंपरी एमआयडीसीतील एका वॉशिंग सेंटर चालकाला सीमा सावळे यांनी १६ गुंडांना सोबत घेऊन बेदम मारहाण केली होती. सीमा सावळे यांचे गुरू सारंग कामतेकर यांचा मुलगा समर कामतेकर याने या वॉशिंग सेंटरवर आपली कार वॉशिंगसाठी नेली होती. वॉशिंग झाल्यानंतर गाडी व्हॅक्युम न केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर समर कामतेकर यांनी फोन केल्यानंतर वॉशिंग सेंटरमध्ये जाऊन सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांच्यासह १६ जणांनी त्या वॉशिंग सेंटर चालकाला बेदम मारहाण केली होती. तसेच वॉशिंग सेंटरची तोडफोडही केली होती. त्याचप्रमाणे सीमा सावळे यांच्या बहिणीच्या मुलाने वॉशिंग सेंटरवरील सीसीटीव्हीचे नुकसान करून पुरावे नष्ट केले होते. सीमा सावळे यांनी वॉशिंग सेंटर चालकाला अश्लिल शिवीगाळ करत त्याला त्याच्या मूळ गावी पाळवून लावण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एखाद्या सामान्य माणसाने असा गुन्हा केला असता तर त्याला तातडीने अटक केली असती. मात्र सीमा सावळे यांच्या या प्रकरणात पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. साहजिकच त्यामागे सीमा सावळे या गडगंज आणि पैसेवाल्या आहेत हे कारण आहेच. आजपर्यंत या प्रकरणात एकालाही अटक नाही की त्यांच्यावर कोणती कारवाई झाली आहे. एवढेच नाही तर या प्रकरणानंतर सारंग कामतेकर याचा मुलगा समर कामतेकर याला परदेशात पळवून लावण्यात आले आहे. पैसेवाले, बड्या बापाचे आणि राजकारण्यांची मुले किंवा राजकारणी स्वतःच एखाद्या गुन्ह्यात असतात, तेव्हा पोलिस ते प्रकरण कसे दाबतात याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. आज त्याच सीमा सावळे पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात संस्कार, नैतिकता यावर बोलताना पाहून आश्चर्याचा धक्काच बसल्याचे अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा छायाताई सरवदे यांनी सांगितले.
छायाताई सरवदे म्हणाल्या, “सीमा सावळे यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे कसे आहेत हे भोसरीतील बालाजीनगरमधील जनताच जाणते असे नाही तर आता त्यांना संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर चांगलेच ओळखायला लागले आहे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही त्यांची सवय आहे. इतकेच काय तर महानगरपालिकेच्या सभागृहात एका पत्रकाराला मारण्याची धमकी सीमा सावळे यांनी दिली होती. कारण काय तर हा पत्रकार सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्या ब्लॅकमेलिंगचा धंदा जगासमोर आणतो. तरीही सीमा सावळे यांच्यावर पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत.
राजकारणाची शाल पांघरून महिला असल्याचा फायदा उठवत ब्लॅकमेल आणि शिवीगाळ करून पैसे कमविणे हाच एकमेव धंदा सीमा सावळे यांचा आहे. हे कोणाला कळू नये यासाठी ब्लॅकमेल करून जमवलेल्या काळ्या पैशातून सुरू केलेल्या एक न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवर बसून कुठल्या तरी विषयावर समाजाला नैतिकता शिकविण्याचा त्या प्रयत्न करतात. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईच्या संस्कारावर बोलणाऱ्या सीमा सावळे यांच्यातील खरे संस्कार हे वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण करताना दिसून आले आहेत. संपूर्ण आयुष्य ढोंग रचण्यात आणि ब्लॅकमेल करण्यात गेलेल्या सीमा सावळे यांनी संस्कारावर बोलताना संपूर्ण शहर आपला खरा चेहरा ओळखतो, याचे तरी भान ठेवावे. बालाजीनगरमधील अनेक गोरगरीब घरातील मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, त्यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळविणाऱ्या, ब्लॅकमेल करून कमाविलेल्या काळ्या पैशातून पोलिसांना विकत घेत येथील तरुणांना तडीपार करायला लावण्याचा उद्योग करणाऱ्या सीमा सावळे यांना आता बालाजीनगरची जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.”