बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एकही मतदारसंघ न लढणाऱ्या मनसेला गळती; के. के. कांबळे यांनी पक्षाला ठोकला रामराम

Spread the love

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे शहरातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्यातून आता शहर मनसेला गळती लागण्यास सुरूवात झाली आहे. मनसेचे पिंपरी विधानसभा संघटक के. के. कांबळे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी करीत होते. मात्र पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूकच न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

मनसे विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. कोणासोबतही आघाडी अथवा युती न करता निवडणूक लढविणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये देखील मनसे तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवार देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यादृष्टीने पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीची तयारी देखील करीत होते. मात्र पक्षाने महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघात उमेदवारच उभे न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. इथल्या पक्ष संघटनेला इतर सर्व राजकीय पक्षांसोबत केवळ वाटाघाटी करण्यासाठीच ठेवले गेले आहे की काय?, निवडणूक न लढता पक्ष संघटना वाढणार कशी?, असे सवाल हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता विचारू लागले आहेत.
मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील या अस्वस्थतेतून आता पक्षाला गळती लागण्यास सुरूवात झाली आहे. मनसेचे पिंपरी विधानसभा संघटक के. के. कांबळे यांनी शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्याकडे पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. के. के. कांबळे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी ते गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी देखील करीत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने त्यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघात मनसेचे इंजिन धावेल या इराद्याने के. के. कांबळे काम करीत होते. मात्र ऐनवेळी पक्षाने पिंपरी-चिंचवडमधील एकही विधानसभा मतदारसंघ न लढविण्याचा निर्णय घेतल्याने के. के. कांबळे नाराज झाले होते.
अखेर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. के. के. कांबळे यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवड मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची खदखद बाहेर आली आहे. के. के. कांबळे यांच्यापासून सुरू झालेली शहर मनसेतील गळती कुठेपर्यंत जाऊन थांबते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मनसेची पक्ष संघटना बऱ्यापैकी काम करीत आहे. महापालिकेत सचिन चिखले हे पक्षाचे एकमेव नगरसेवक होते. तसेच गेली कित्येक वर्षे सचिन चिखले यांच्याकडेच मनसेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र पक्ष संघटनेत वाढ होत नसल्याचे गेल्या कित्येक वर्षातील चित्र आहे. काही ठराविक पदाधिकारी म्हणजेच पिंपरी-चिंचवड मनसे असे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button