बॅनर न्यूज
भोसरी विधानसभा मतदारसंघात रवि लांडगे यांनी फोडली डरकाळी; मी पाठीत नाही छातीत वार करणार
भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे धाबे दणाणले

पिंपरी : महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांना जे जे माझ्या पाठीत वार करायचे होते ते सर्व करून झाले. मी एकदाच त्यांच्या छातीत वार करेन. हा वार करण्याची संधी नियती मला आज नाही तर उद्या नक्कीच देणार आहे, अशा शब्दांत भोसरी मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार रवि लांडगे यांनी डरकाळी फोडली आहे. हे दोघेही पैशाने बलाढ्य आहेत. पण नितीमत्तेने शून्य आहेत. त्यांनी आयुष्यभर फक्त सत्ता, पैसा, खोटी आश्वासने, सत्तेचा गैरवापर हेच केले आहे, असा थेट हल्लाबोल रवि लांडगे यांनी केला आहे. तसेच शिवसैनिकांचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे राजकीय धाबे दणाणले आहेत.
रवि लांडगे हे भाजपचे माजी बिनविरोध नगरसेवक आहेत. भाजपच्या स्थापनेपासून लांडगे कुटुंबीय या पक्षाचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. मात्र बिनविरोध निवडून येऊनही रवि लांडगे यांना भाजपने पाच वर्षात महापालिकेत एकही मानाचे पद दिले नाही. उलट कधी काळी भाजपचे चिन्ह कमळ आणि भाजपच्या नेत्यांचे फोटो पायदळी तुडविलेल्यांना महापालिकेत मानाची अनेक पदे दिली गेली. त्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या रवि लांडगे यांनी भाजपचा सोडून दोन वर्षे ते राजकारणातून अलिप्त राहिले होते. मात्र भोसरी मतदारसंघातील जनतेने रवि लांडगे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. त्यामुळे रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द देऊन पक्षाच्या एबी फॉर्मची सुद्धा पूर्तता त्यांच्याकडून करून घेण्यता आली. मात्र ऐनवेळी आर्थिक उलाढाल होऊन रवि लांडगे यांची उमेदवारी कापण्यात आली.
त्यानंतर भोसरी मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांनी सोमवारी निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना रवि लांडगे यांनी त्यांचे तिकीट कापण्यासाठी घडलेल्या राजकीय घडामोडी जनतेसमोर मांडल्या. विद्यमान आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे या दोघांनाही रवि लांडगे यांच्या उमेदवारीची भिती होती. हे दोघेही जनतेसमोर आम्ही एकमेकांच्या विरोधात असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत असले, तरी रवि लांडगे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी दोघेही हातात हात घालून प्रयत्न करीत होते, हे रवि लांडगे यांची आता जनतेसमोर आणले आहे. दोघांनीही कोट्यवधींची आर्थिक उलाढाल करून रवि लांडगे यांची उमेदवारी कापल्याचे निष्ठावान शिवसैनिकांनाही समजल्यामुळे भोसरी मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रवि लांडगे यांनी निर्धार मेळाव्यात बोलताना महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांना जे जे माझ्या पाठीत वार करायचे होते ते सर्व करून झाले. मी एकदाच त्यांच्या छातीत वार करेन. हा वार करण्याची संधी नियती मला आज नाही तर उद्या नक्कीच देणार आहे, अशा शब्दांत रवि लांडगे यांनी डरकाळी फोडली आहे.
भोसरी मतदारसंघातील शिवसैनिकांची एकजूट गरजेची आहे. एकजूट नसेल, तर शिवसैनिकांना गृहित धरले जाईल. तुमच्या स्वाभिमानाशी खेळले जाईल. तुमचा स्वाभिमान तुमच्यात नसेल तर हा भगवा झेंडा घेऊन काही उपयोग नाही. कायम स्वाभिमानी राहून वाटचाल करा. तुमच्या सर्वांच्या आणि जनतेच्या भावना व आग्रहाचा आदर करत मी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा रवि लांडगे यांनी निर्धार मेळाव्यात केला आहे. निवडणूक लढणार तर जिंकण्यासाठीच आणि थांबणार तर शिवसैनिकांचा स्वाभिमान व सन्मान मिळवून देण्यासाठीच असाही निर्धार रवि लांडगे यांनी व्यक्त केला आहे. विरोधक पैशाने बलाढ्य आहेत. पण नितिमत्तेने शून्य आहेत. त्यांनी फक्त सत्ता, पैसा, खोटी आश्वासने, सत्तेचा गैरवापर आयुष्यभर हेच केले आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आज ना उद्या बदल होणारच आहे. परिवर्तन झाल्याशिवाय आपण थांबायचे नाही. ही सत्याची लढाई सत्यानेच लढायचे. भोसरीतील जनता नक्कीच न्याय देईल, असा विश्वासही रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.