बॅनर न्यूज

भोसरीत आमदार महेश लांडगे यांचा विजय पक्का; हॅट्ट्रिक करणारे शहरातील दुसरे आमदार ठरणार

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा विजय फिक्स झाला आहे. महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार असून, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच आमदार लांडगे यांच्या गटामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आमदार लांडगे गटाने सुद्धा अजित गव्हाणे हेच समोर उमेदवार असावेत यासाठी देव पाण्यात घातले होते. अखेर त्यांना देव पावला असून, विधानसभा निवडणुकीत आमदारकीची हॅट्ट्रिक करणारे ते शहरातील दुसरे आमदार ठरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघासाठी सर्वात आधी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे महायुती शहरात जोमाने प्रचाराला लागली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्याने डोक्यात हवा गेलेल्या महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी बराच वेळ लावला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार हे स्पष्ट झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सुलक्षणा धर-शिलवंत, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात कधी काळी शिवसेनेचे दोन खासदार होते. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एकतरी मतदारसंघ शिवसेना लढल्याचा इतिहास आहे. त्यामुळे तीनपैकी एक विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट लढविणार हे निश्चित मानले जात होते. शहरातील शिवसैनिकांकडून देखील शहरातील एक तरी मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली पाहिजे, अशी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे किमान भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळेल, असे राजकीय चित्र होते. या मतदारसंघातून माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती.

भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या दहा वर्षांच्या कारभाराला कंटाळलेल्या भोसरी मतदारसंघातील जनतेला रवि लांडगे यांच्यामुळे एक आशेचा किरण दिसला होता. आमदार लांडगे यांना रवि लांडगे हेच जशास तसे टक्कर देऊ शकतात हे भोसरी मतदारसंघातील वास्तव राजकीय चित्र आहे. तसेच भाजपमधील निष्ठावान अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा रवि लांडगे यांना विजयी करण्यासाठी आसुसलेले होते. रवि लांडगे यांच्याकडे विजयी उमेदवार म्हणून पाहिले जात होते. त्यातच राज्यात सत्ता बदल करण्यासाठी उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीला एक-एक आमदार महत्त्वाचा वाटत असल्याने भोसरी मतदारसंघात रवि लांडगे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईत अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. अनेक वाटाघाटी झाल्या. त्यानंतर महाविकास आघाडीत पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिल्यानंतर भोसरी मतदारसंघातील राजकीय चित्र क्षणार्धात बदलले आहे. समोर रवि लांडगे उमेदवार म्हणून आल्यास विजय सोपा नसल्याची जाणीव असलेले भाजप आमदार महेश लांडगे यांचा गट गेली दोन आठवडे अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात घालून बसला होता. अखेर महेश लांडगे यांच्या गटाला देव पावला असून, अजित गव्हाणे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत. अजित गव्हाणे यांच्या उमेदवारीमुळे महेश लांडगे यांचा विजय सोपा झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आता या मतदारसंघात केवळ नुरा कुस्ती पाहायला मिळू शकते. त्यामुळे आता महेश लांडगे यांच्या गटात आनंदाची लाट पसरली असून, आमदारकीची हॅट्ट्रिक करणारे महेश लांडगे हे शहरातील दुसरे आमदार ठरतील, असे राजकीय चित्र बनले आहे.

यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता आमदार महेश लांडगे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय विक्रमाची बरोबरी करू शकतात, असे राजकीय चित्र भोसरी मतदारसंघात तयार झाले आहे. असे असले तरी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदारसंघात राजकीय प्रचार कसा होतो, महाविकास आघाडीचे वातावरण कसे तयार होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button