बॅनर न्यूज
महाविकास आघाडीत पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघ तुतारी लढविणार
चिंचवड मतदारसंघातून राहुल कलाटे, तर भोसरी मतदारसंघातून अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर

पिंपरी : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राहुल कलाटे, तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेस हद्दपार झाली असून, केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या तीनही विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोणते मतदारसंघ मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जागा वाटप लवकर होत नसल्याचे दोन्ही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. गेली दोन आठवडे इच्छुक मुंबईत ठाण मांडून बसले होते. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात चुरस निर्माण झाली होती. शहरातील तीनपैकी एक विधानसभा मतदारसंघ देण्यात यावा यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आग्रही होता.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत जागा वाटपाचा तिढा कायम होता. अखेर हा तिढा सुटला असून महाविकास आघाडीत हे दोन्ही मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाच मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर केली. त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना, भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या या जागा वाटपात शहरातील तीनपैकी एकही विधानसभा मतदारसंघ न मिळाल्याने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचा फटका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.