बॅनर न्यूज
पिंपरी मतदारसंघातून माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी
पक्षनिष्ठेचे फळ म्हणून तुतारी मिळाली; पिंपरी-चिंचवड टाइम्सचे वृत्त खरे ठरले

पिंपरी : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने एका निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्तीला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आनंद व्यक्त होत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे विरूद्ध राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुलक्षणा धर-शिलवंत यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, पिंपरी मतदारसंघात सुलक्षणा धर-शिलवंत याच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार असतील, असे वृत्त “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने दिले होते. हे वृत्त खरे ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली. मात्र महाविकास आघाडीची नावे समोर येत नसल्याने कार्यकर्त्याबरोबरच मतदारांमध्येही प्रचंड संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीतील कोणता राजकीय पक्ष कोणता मतदारसंघ लढविणार, उमेदवार कोण असणार याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असल्याने गोंधळ निर्माण होत होता. अखेर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका सुरक्षणा धर-शिलवंत यांच्या नावाची घोषणा केल्याने राजकीय गोंधळ दूर झाला आहे.
माजी नगरसेविका सुलक्षणा-धर शिलवंत या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांनी त्यांना भक्कमपणे साथ दिली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पदे घेण्यास कोणीही तयार नव्हते, त्यावेळी धर आणि कामठे यांनी धाडसाने पुढे येत पक्षाला अल्पवधीत शहराच्या राजकीय वर्तुळात आपले वेगळे स्थान निर्माण करून दिले.
विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघातून सुलक्षणा धर-शिलवंत यांच्या नावासाठी तुषार कामठे यांनीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. अखेर कामठे आणि सुलक्षणा-धर शिलवंत या दोघांनाही प्रामाणिक आणि निष्ठेने केलेल्या कामाचे फळ मिळाले आहे. पिंपरी मतदारसंघातून सुलक्षणा धर-शिलवंत यांच्या उमेदवारीवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुलक्षणा धर-शिलवंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यात प्रमुख लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.