बॅनर न्यूज

लोणावळ्यात बेकायदेशीर होर्डींगचे जाळे

नगर परिषद सीमाभिंतीवरील जाहिरातींवरही प्रश्नचिन्ह; अधिकारी मलई खाऊन चिडीचूप

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहर आणि परिसरात बेकायदेशीर होर्डींगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहराचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे लोणावळा नगर परिषद इमारतीच्या सीमाभिंतीवर उभारण्यात आलेल्या काही जाहिरात फलकांनाही अधिकृत परवानगी नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते, सार्वजनिक जागा आणि इमारतींच्या परिसरात नियमबाह्य होर्डींग उभारण्यात आल्याचे नागरिकांकडून वारंवार निदर्शनास आणून दिले जात आहे. अनेक ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी आवश्यक परवानगी, कर आकारणी किंवा सुरक्षिततेच्या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप आहे. परिणामी, नगर परिषदेला मिळणारे महसूल उत्पन्न थेट बुडत असून, शहराच्या विकासासाठी वापरता येणारा निधी कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप कुऱ्हाडे यांनी लोणावळा नगर परिषदेकडे निवेदन सादर करून शहरातील सर्व बेकायदेशीर होर्डींगची तातडीने तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या जाहिरात फलकांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याने काहींचे आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

कुऱ्हाडे यांनी दिलेल्या निवेदनात, नगर परिषद प्रशासनाने शहरातील सर्व जाहिरात फलकांची परवानगी, महसूल नोंदी आणि कर आकारणीची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नियमबाह्य होर्डींग हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोणावळा शहर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहराचे सौंदर्य, वाहतूक सुरक्षितता आणि प्रशासनाची पारदर्शकता टिकवण्यासाठी बेकायदेशीर जाहिरात फलकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता नगर परिषद प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button