बॅनर न्यूज
शाहूनगरमध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा; माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस
पालकांना दिला धीर; डॉ. डी. वाय. पाटील शाळेवर कारवाईची केली मागणी

पिंपरी : चिंचवड, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना गुरूवारी विषबाधा झाली. त्यानंतर या मुलांना चेतना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे युवानेते व माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची सूचना डॉक्टरांना केली. विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला. या संपूर्ण घटनेची माहिती घेत शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
शाहूनगर येथील डॉ. डी वाय पाटील इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये प्रत्येक वर्गनिहाय पदार्थ बनवण्याचा क्लास घेतला जातो. गुरूवारी सकाळी पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कुकिंग सेशन घेण्यात आले. सकाळी वर्गामध्ये सँडविच बनवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक जमले. त्यासाठी बाजारातून भाजीपाला, ब्रेड, सॉस आणले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सँडविच बनवले. कुकिंग सेशन पूर्ण झाल्यानंतर हे सँडविच विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिले. शाळेतील एकूण ३१५ विद्यार्थ्यांनी हे सँडविच खाले. त्यानंतर मुलांना त्यांच्या वर्गामध्ये पाठवण्यात आले. मात्र, दहा ते पंधरा मिनिटानंतर मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्रास होत असलेल्या सर्व मुलांना तातडीने शाळेची बस तसेच रिक्षाने चेतना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील ९ मुलांची प्रकृती जास्त बिघडली होती. त्यांच्यावर रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात उपचार सुरू करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवानेते व माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी तातडीने चेतना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. विषबाधा झालेल्या मुलांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा करून विषबाधा झालेल्या मुलांवर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. मुले लवकर बरी व्हावीत यासाठी त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक उपचार करण्याची सूचना त्यांनी डॉक्टरांना केली. तसेच विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्याचप्रमाणे पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी त्यांनी केली.