प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपच्या चारही उमेदवारांच्या विजयासाठी नागरिकांचे विठ्ठलाला साकडे
धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा राऊत, संगीता भोंडवे व दिपक भोंडवे यांनी घेतले जनतेचे आशीर्वाद

भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे आणि भाजप पॅनेलच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. बुधवारी सकाळी एकादशीचे औचित्य साधून रावेतगाव, मामुर्डी आणि किवळे येथील भाविकांसाठी पंढरपूरला दोन आरामदायी बसेस रवाना करण्यात आल्या. विठ्ठलनामाच्या जयघोषात भाविकांनी पंढरीची वाट धरली. यावेळी धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा राऊत, संगीता भोंडवे आणि दिपक भोंडवे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. राजकीय प्रवासाची सुरुवात आध्यात्मिक आणि सेवाभावी कार्याने केल्याबद्दल नागरिकांनी भाजपच्या या चारही उमेदवारांचे विशेष कौतुक केले.
पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार
उमेदवारी मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना उमेदवार म्हणाले की, “पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवू. मामुर्दी, किवळे, विकासनगर आणि रावेत-गुरुद्वारा या भागातील रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता असेल. प्रभाग १६ च्या सर्वांगीण विकासासाठी आमचे पूर्ण पॅनेल कटिबद्ध आहे.”
कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि आनंदोत्सव
अधिकृत घोषणा होताच मामुर्दी आणि रावेत परिसरातील जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. विकासनगर आणि गुरुद्वारा परिसरातही कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. चारही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क आणि पक्षाची ताकद यामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे.



