पिंपरी चिंचवड
भाजपने तीन उमेदवार प्रभागाबाहेरचे दिले
नवी सांगवीकरांचा संताप; आज सायंकाळी निर्धार मेळाव्याचे आयोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-विनायकनगर-गणेशनगर-उरो रुग्णालयमध्ये प्रभागाबाहेरचे तीन उमेदवार दिल्याने नवी सांगवीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या उमेदवारांना विरोध करण्यासाठी नवी सांगवीकरांनी वज्रमूठ बांधली असून, बुधवार (आज) सायंकाळी साडेसहा वाजता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष अमित पसरणीकर यांनी केले आहे.
पिंपळेगुरव आणि नवी सांगवी हा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात महापालिकेचे तीन निवडणूक प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २९, ३१ आणि ३२ या तीन प्रभागांचा समावेश आहे. यातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये नवी सांगवी-विनायकनगर-गणेशनगर-उरो रुग्णालय या भागातून यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपने या प्रभागाबाहेरील उमेदवार दिले आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांनी या प्रभागातून दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. आता त्यांच्यासह भाजपने इतर तीनही उमेदवार प्रभागाबाहेरचे दिले आहेत. तीनही उमेदवार प्रभागाबाहेरचे असल्याने नवी सांगवीकरांचा संताप झाला आहे. नवी सांगवीमध्ये एकही लायक उमेदवार नाही का?, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या संतापातूनच नवी सांगवीकरांनी बुधवार (आज) सायंकाळी साडेसहा वाजता निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे शहर उपाध्यक्ष अमित पसरणीकर यांनी केले आहे. पक्षाने नवी सांगवीकरांवर केलेला हा अन्याय असून, त्याला वाचा फोडण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.



