पिंपरी चिंचवड
पिंपरी कॅम्पमध्ये महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला मारल्याप्रकरणी दोघांना अटक

पिंपरी : विना लायसन्स दुचाकी चालविल्याने कारवाई करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या कानावर मारून कान बधीर केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी कॅम्पमधील शगुन चौकात रविवारी ही घटना घडली.
याप्रकरणी पिंपरी वाहतूक शाखेतील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमाकांत ऊर्फ महादू भगवान वाघमारे (वय २०, रा. थेरगाव), स्वप्नील धम्मपाल गाडे (वय २२, रा. पिंपरीगाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपरी कॅम्पमधील शगुन चौकात वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरील (एमएच १४ जेझेड ९४०१) चालकाकडे लायसन्स नसल्यामुळे फिर्यादी यांनी दुचाकीवर कारवाई केली. त्यामुळे दुचाकी चालकाने फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घातली. मी पण तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देत तो निघून गेला. त्यानंतर दुचाकी चालकाचा मित्र असलेला आरोपी उमाकांत याने फिर्यादी यांच्या डाव्या कानावर जोरात फटका मारून पळून गेला. त्यामुळे फिर्यादी यांचा कान एका बाजूने बधीर झाला. त्याचा पाठलाग केला असता तो गल्लीतून पळून गेला. त्याला पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.