बॅनर न्यूज

भोसरी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का; निवडणूकपूर्व प्रत्येक सर्व्हेत रवि लांडगे यांची धगधगतेय मशाल

शिवसेना उद्धव ठाकरे गटात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण

Spread the love
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आणि विद्यमान आमदारासह इच्छुकांनी वेगवेगळ्या माध्यमातून निवडणूकपूर्व सर्व्हे केल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचून तसेच ऑनलाईन पद्धतीने अनेकदा हे सर्व्हे करण्यात आले आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये विद्यमान आमदारासह सर्व इच्छुकांपैकी माजी नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार रवि लांडगे हे भोसरीचे मैदान मारणार असल्याचा अंदाज समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. या सर्व्हेविषयी भोसरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघात मशाल पेटली, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही महाविकास आघाडीची संयुक्त सत्ता येण्याची राजकीय चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघात निवडणुकीची घोषणा होण्याआधीच रवि लांडगे यांच्या नावाची राजकीय हवा जोरात असल्याचे चित्र आहे.   
 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूकपूर्व सर्व्हे केला जात आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांच्या फरकाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हा निवडणूकपूर्व सर्व्हे केला जात आहे. त्यातून त्या मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो, याची माहिती राजकीय पक्ष गोळा करीत आहेत. त्याचप्रमाणे त्या त्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांसह निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडूनही आपापल्या मतदारसंघात निवडणूकपूर्व सर्व्हे केला जात आहे. पुढची राजकीय रणनिती ठरविण्यासाठी आणि उमेदवार निवडण्यासाठी या निवडणूकपूर्व सर्व्हेचा वापर केला जाणार आहे. या सर्व्हेच्याच आधारे निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे राजकीय पक्षांच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून संकेत मिळत आहेत. 
 
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात सुद्धा सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकपूर्व सर्व्हे केले आहेत. एकदा, दोनदा नाही, तर अनेकदा हे निवडणूकपूर्व सर्व्हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय इच्छुक उमेदवारांकडूनही वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघात सातत्याने निवडणूकपूर्व सर्व्हे सुरू आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन माध्यमातूनही मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज घेतला जात आहे. त्यानुसार भोसरी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या निवडणूकपूर्व सर्वच सर्व्हेमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रत्येक सर्व्हेमध्ये माजी नगरसेवक रवि लांडगे यांनाच भोसरी मतदारसंघातील जनतेची प्रथम पसंती मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भोसरी मतदारसंघात रवि लांडगे यांचा विजय निश्चित असल्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा निवडणूकपूर्व सर्व्हे सांगत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निवडणूकपूर्व सर्व्हेमुळे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसत असल्याचे राजकीय चित्र आहे.
आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या बंधूंनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात ज्या पद्धतीने कारभार केला तो आता माजी नगरसेवक रवि लांडगे यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेतून समोर येत आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्याविषयी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. एवढेच नाही तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातही आमदार महेश लांडगे यांच्याबाबत तीव्र असंतोष खदखदत आहे. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव म्हणजे महेश लांडगे अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा सोडले नाही, असे चित्र मतदारसंघात आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावर करण्यात येणाऱ्या खर्चाचा आकडा ऐकूनच मतदारसंघातील जनतेचे डोळे पांढरे झाले आहेत. पैसे खाण्यासाठी जे अखंड महाराष्ट्राच्या दैवतांना सुद्धा सोडत नाहीत, त्यांचा दहा वर्षाचा कारभार काय असेल, असे आता या मतदारसंघातील जनता उघडपणे बोलताना दिसत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हे भ्रष्टाचाराचे केवळ एक उदाहरण आहे. या मतदारसंघातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. आमदार महेश लांडगे यांनी स्वपक्षाचा असो की इतर पक्षाचा असो कोणत्याच नगरसेवकाला कधीच कोणत्या कामाचे श्रेय घेऊ दिल्याचे कधी दिसले नाही. प्रत्येक काम मीच केले हे दाखविण्याचा आमदार महेश लांडगे यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील नागरिकच नाही तर स्वपक्षाचे नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांची जबरदस्त राजकीय दहशत असल्याचे वास्तव आहे. हेच वास्तव आता त्यांच्या  चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक तोंडावर आलेली असूनही महेश लांडगे यांच्यासोबत भाजपचेच माजी नगरसेवक कुठे दिसत नसल्याचे उघड चित्र मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांना आता फक्त जाहिरातबाजीचाच आधार उरल्याचे राजकीय चित्र आहे. आमदारांनी स्वतःच्या चमकोगिरीसाठी मतदारसंघातील साधी मुतारी सुद्धा सोडली नाही, अशी आपसूक प्रतिक्रिया मतदारसंघात उमटत आहे.
या सर्व गोष्टींचा राजकीय परिणाम म्हणजे भोसरी मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी नगरसेवक रवि लांडगे मताधिक्याने बाजी मारतील, असे निवडणूकपर्व सर्व्हेमध्ये दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रवि लांडगे हे भोसरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढण्यासाठी सज्ज आहेत. निवडणूकपूर्व सर्व्हेत ते विजयी होणार असल्याचे दिसत असल्याने भोसरी मतदारसंघातील शिवसैनिक व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे चित्र आहे. गेली अनेक वर्षे राजकीय दडपशाहीला सामोरे जावे लागलेल्या शिवसैनिकांना आता रवि लांडगे यांच्यामुळे मोठे बळ प्राप्त झाले आहे. “भोसरी विधानसभा तो झाँकी है, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अभी बाकी है”, अशी प्रतिक्रिया काही शिवसैनिक देऊ लागले आहेत. आता फक्त महाविकास आघाडीकडून रवि लांडगे यांची उमेदवारी कधी जाहीर होते, याचीच उत्सुकता शिवसैनिकांनी लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन अटळ असल्याचे दिसत आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button