पिंपरी चिंचवड
तळवडेतील कॅनबे चौकात रस्त्यावर ठेवलेले पाईप तत्काळ हटवा – श्रीनिवास बिरादार

भोसरी : तळवडे, कॅनबे चौकातील मुख्य रस्त्यावर पाईप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडीचा सामना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठेवण्यात आलेले हे पाईप हटविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात श्रीनिवास बिरादार यांनी वाहतूक पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तळवडे, कॅनबे चौकातील मुख्य रस्त्यावरच गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाईप ठेवण्यात आलेले आहेत.आधीच हा रस्ता अरुंद आहे. तसेच या चौकातून चाकण एमआयडीसीला जाता येते. या परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या व औद्योगिक कंपन्या असल्याने या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात जड व अवजड वाहनांची वाहतूक चालू असते. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या पाईपांच्या ढीगामुळे प्रवाशांना तसेच वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित यंत्रणा कोणतीच उपाययोजना करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याची तात्काळ दाखल घेऊन मुख्य रस्त्यावर असणारे पाईप तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”