बॅनर न्यूज
विधानसभा निवडणुकीत भोसरीमध्ये टफ फाईट; महेश लांडगेंच्या विरोधात रवि लांडगे की नितीन काळजे?

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टफ फाईट होण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत. भोसरीचे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे हॅट्ट्रिकसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपचेच माजी महापौर नितीन काळजे किंवा भाजपचेच माजी नगरसेवक रवि लांडगे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीत शड्डू ठोकण्याची राजकीय शक्यता आहे. या दोघांपैकी रवि लांडगे हे तगडे आणि आमदार महेश लांडगे यांना तोडीस तोड उमेदवार मानले जातात. निवडणूक जसजशी जवळ येत याईल, तसतसे भोसरी मतदारसंघात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. भोसरी मतदारसंघात सबकुछ आमदार महेश लांडगे असे चित्र नेहमी रंगवले जाते. त्यामुळे आमदार लांडगे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याची घोषणा केली होती. तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. प्रत्यक्षात भोसरीतून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना ९ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. आमदार महेश लांडगे हे सलग दोनवेळा भोसरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. याशिवाय भाजपच्या अनेक घटकांना सुद्धा लांडगे यांनी नाराज केलेले आहे. भाजपचे अनेक माजी नगरसेवक लांडगे यांच्याविषयी नाराजी बाळगून आहेत. अनेक समर्थक नगरसेवक त्यांना सोडून अन्य पक्षात गेले आहेत. या मतदारसंघात लांडगे यांच्या विरोधात राजकीय वातावरण स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आमदारकीची हॅट्ट्रिक करणे लांडगे यांना जड जाईल, अशी परिस्थिती आहे. तेच या मतदारसंघात भाजपचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भोसरी मतदारसंघातून अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र त्या अनेक चर्चित नावांमध्ये निवडून येण्याची आणि आमदार महेश लांडगे यांना जशास तसे उत्तर देण्याची राजकीय धमक दिसत नाही. ही धमक फक्त भाजपचे माजी महापौर नितीन काळजे आणि भाजपचेच माजी नगरसेवक रवि लांडगे यांच्यामध्ये असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नितीन काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत एकदाही नितीन काळजे आमदार महेश लांडगे यांच्यासोबत कुठेही दिसले नाहीत. आता नितीन काळजे यांनी आमदारकी लढविण्यासाठी राजकीय पर्यायांचा शोध सुरू केल्याची चर्चा भोसरी मतदारसंघात आहे. महेश लांडगे यांना दोनवेळा आमदार करण्यात नितीन काळजे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आता तेच दुरावल्यामुळे आमदार लांडगे यांना निवडणुकीत जोरदार सेटबॅक बसण्याची शक्यता दिसत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे हे भोसरी मतदारसंघातील इच्छुकांपैकी सर्वाधिक चर्चेतील नाव आहे. रवि लांडगे यांनी कुठेही आमदारकी लढविण्याचा इरादा स्पष्ट केलेला नाही. तरी सुद्धा आमदार महेश लांडगे यांचा पराभव करायचा असेल, तर रवि लांडगे यांनीच मैदानात उतरले पाहिजे अशी मतदारसंघातील बहुतांश जण इच्छा व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. जनतेची इच्छा म्हणून महाविकास आघाडीने रवि लांडगे यांना भोसरीच्या मैदानात उतरविल्यास येत्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकरांना एकदम टफ फाईट पाहायला मिळू शकते. रवि लांडगे यांना भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा होऊ शकतो. याशिवाय रवि लांडगे यांची मतदारसंघातील तरुणाईमध्ये प्रचंड मोठी क्रेझ आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील सर्वात जास्त तगडे उमेदवार म्हणून रवि लांडगे यांच्याकडे पाहिले जात आहे.
नितीन काळजे आणि रवि लांडगे यांच्या व्यतिरिक्त इच्छुकांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र अजित गव्हाणे हे आमदारकीच्या रेसमधले कमी आणि दरबारी राजकारणातील व्यक्तिमत्त्व म्हणून जास्त ओळखले जातात. त्यांच्याकडे भोसरी मतदारसंघात फारसे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचेही नाव इच्छुकांमध्ये घेतले जाते. या मतदारसंघात विलास लांडे यांची मोठी राजकीय ताकद आहे. मात्र आता त्यांनी मार्गदर्शक मंडळात राहून राजकीय सूत्रे हलवावीत. विधान परिषद किंवा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मतदारसंघात व्यक्त होत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांची भूमिका निर्णायक असणार आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघात कोणाला शड्डू ठोकण्यास लावते?, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.