बॅनर न्यूज

तब्बल ५०० गाड्या, हजारो कार्यकर्त्यांचा ताफा…१५० किलोमीटर शक्तीप्रदर्शन करत रवि लांडगे यांचा दणक्यात ठाकरे गटात प्रवेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार; रवि लांडगे यांनी केला इरादा स्पष्ट

Spread the love
पिंपरी : तब्बल ५०० गाड्या आणि हजारो कार्यकर्त्यांचा ताफा, हातात भगवे झेंडे घेत १५० किलोमीटरपर्यंत शक्तीप्रदर्शन करत माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (मंगळवार) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. “जय भवानी, जय शिवाजी” आणि “रवि लांडगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”च्या जयघोषात मुंबईतील मातोश्री येथे हा प्रवेश सोहळा दणक्यात पार पडला. प्रवेशासाठी पिंपरी-चिंचवडपासून ते मुंबईतील मातोश्रीपर्यंत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. पक्षप्रवेशानंतर रवि लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.  
माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रचार देखील सुरू केला आहे. गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात त्यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असा आहे. ते जिथे जातील तेथे त्यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या ओठी रवि लांडगे यांचेच नाव असल्याचे चित्र आहे. किंबहुना रवि लांडगे यांनी विधानसभा लढवावी, अशी या मतदारसंघातील नागरिकांचाच आग्रह जास्त होत आहे. त्यामुळे रवि लांडगे हे विधानसभा लढण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. 
भोसरीमध्ये १५ ऑगस्ट रोजी रवि लांडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील एकाही राजकीय नेत्याचा आजपर्यंत साजरा झाला नसेल, असा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील, विविध घटकातील, विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रचंड गर्दीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाला झालेली गर्दी म्हणजे रवि लांडगे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाची नांदी मानली जात आहे. फक्त ते कोणत्या पक्षाकडून लढणार याची उत्सुकता संपूर्ण भोसरी मतदारसंघालाच लागली होती. अखेर मतदारसंघातील नागरिकांची ही उत्सुकता संपली आहे. 
 
रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात मंगळवारी जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलींद नार्वेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. या पक्ष प्रवेशापूर्वी रवि लांडगे व त्यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तब्बल ५०० हून अधिक गाड्या आणि हजारो कार्यकर्त्यासह रवि लांडगे यांनी मातोश्रीपर्यंत १५० किलोमीटर जंगी शक्तीप्रदर्शन केले. या पक्ष प्रवेशाची भोसरीपासून ते पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे तसेच मातोश्रीपर्यंत पक्ष प्रवेशाची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवि लांडगे यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. 
 
त्यानंतर बोलताना रवि लांडगे यांनी पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी काम करणार असल्याचा इरादाही त्यांनी स्पष्ट केला.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button