दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्याला अटक

पिंपरी : दुचाकीवरून चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. थेरगाव, पडवळनगर येथे मंगळवारी ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस ऊर्फ भैय्या नितीन वायदंडे (वय २१, रा. चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ऍक्टिवा गाडीवरून थेरगाव, पडवळनगर येथील शिवलिंग मंदिरात गेल्या होत्या. तेथून त्या घरी परत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील १ लाख किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून काळेवाडी फाट्याच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला निष्पन्न केले. त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.