संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे ऑफर लेटर
मावळ : मावळ तालुक्यातील भाजे, मळवली येथील संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे ऑफर लेटर देण्यात आले.
आजच्या स्पर्धेच्या युगात शहरी व ग्रामीण भागातील रोजगार व स्वयंरोजगार संबंधी युवकांची अडचण लक्षात घेऊन भाजे, मळवली येथील संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील दुर्लभ घटकातील युवकांना औद्योगिक व व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वीच नामांकित कंपनीतील वरिष्ठ अधिकारी बोलावून रोजगार मेळावे व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम यांच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यातून या युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी विद्यार्थ्याला सर्वात महत्वाचा असा नोकरीचा प्रश्न भेडसावत नाही.
त्यानुसार संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच रोजगार मेळावा घेण्यात आला. प्राचार्य आर. एस. जोशी, प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रमोद भैरवकर, आयटीआय निदेशक वर्ग अनंता इंगोले, सुनील धर्मे, शितल चाकचव्हान, गौतम इंगळे, शिवाजी हैबतकर, महेश कलातगे, सुशील सर यांच्या सहकार्याने हा भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिर पार पडले. त्यामध्ये महिंद्रा स्टील प्रा. लि., के. के. नाग प्रा.लि., फिनोलेक्स प्लॅसन इंडस्ट्रिज प्रा.लि. व पुना शीम्स प्रा.लि. यांसारख्या नामांकित कंपन्या व कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या रोजगार मेळाव्यात संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन कंपन्यांनी जागेवरच ऑफर लेटर दिले. रोजगार उपलब्ध झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने अभिनंदन केले.