बॅनर न्यूज
महाविकास आघाडीचे ठरले; चिंचवड आणि पिंपरीत तुतारी वाजणार, तर भोसरीत मशाल पेटणार?
पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांचे जागा वाटप जवळपास निश्चित

पिंपरी : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांचे जागा वाटप कसे होणार याबाबत इच्छुकांसोबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान आमदारांसह अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठका, गाठीभेटी, विविध कार्यक्रम तसेच सोशल मीडियावर सक्रिय होत इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व इच्छुकांचे आता महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप कसे होते याकडे लक्ष लागलेले आहे. महायुतीत भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे महायुतीत भोसरी आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपला, तर पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार हे निश्चित आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. त्यांच्यात शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांचे वाटप कसे होणार याबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. तीनपैकी दोन राष्ट्रवादी शरद पवार गट, तर एक मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याचे बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर पिंपरी-चिंचवडच्या तीन मतदारसंघांचे वाटप जवळपास निश्चित झाले असून, पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असणार हे ठरल्याचे सांगितले जात आहे. या ठरलेल्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.