धक्कादायक! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांऐवजी बीव्हीजी कंपनीच्या वॉर्ड बॉयकडून उपचार
पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सायली नढे यांनी व्यक्त केला संताप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात डॉक्टरांऐवजी चक्क सुरक्षा व सफाई कर्मचारी पुरविणाऱ्या बीव्हीजी कंपनीचा वॉर्ड बॉय रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील हा भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे.
बीव्हीजी ही कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची विविध कामे घेणारी ठेकेदार कंपनी आहे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या साफसफाईसह कचरा उचलण्यापर्यंतची हजारो कोटींची कामे या कंपनीला देण्यात आली आहेत. मात्र या कंपनीमार्फत होणाऱ्या प्रत्येक कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार असल्याचे उघड गुपित आहे. महापालिकेचे अधिकारी या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटतात. किंबहुना महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांचे घर या कंपनीकडून भ्रष्ट मार्गाने मिळणाऱ्या पैशातून चालते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात नेहमी होत असते. आता तर या कंपनीचा एक वॉर्ड बॉयच महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयातील हा प्रकार समोर आणला आहे. तन्मेश इंगवले या व्यक्तीच्या पायाला ६ जुलै २०२४ रोजी दुचाकीच्या धडकेत गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ते जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथे त्यांना तातडीच्या विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा एक्स-रे काढला. त्यात इंगवले यांच्या पाय क्रॅक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या पायाला डॉक्टरांऐवजी चक्क बीव्हीजी कंपनीच्या वॉर्ड बॉयने प्लास्टर केले. रुग्णाच्या जिवाशी खेळण्याच्या या प्रकाराबद्दल पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्तांकडे महापालिकेमार्फत शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र दिले आहे.