बॅनर न्यूज

भोसरी मतदारसंघात भाजपने महेश लांडगे यांच्याऐवजी मला उमेदवारी द्यावी; सचिन काळभोर यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

Spread the love
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांनी दहा वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना केवळ स्वतःचे हित पाहिले आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारण्याच्या कामातही भ्रष्टाचार केल्याचा संदेश मतदारांमध्ये गेला आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांचा निवडणुकीत पराभव होऊन भाजपला नाचक्की सहन करावी लागू शकते. तसे होऊ नये यासाठी भाजपने भोसरी विधानसभा मतदारसंघात मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. 
 
यासंदर्भात सचिन काळभोर यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, “विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजप लढविणार आहे. या मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार महेश लांडगे यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये. महेश लांडगे हे १० वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना पुरते अपयशी ठरलेले आहेत. केवळ गाजावाजा करणे, विविध इव्हेंट करणे एवढेच काम महेश लांडगे यांनी केले आहे. त्यांनी मतदारसंघात विकासापेक्षा बकालपणा निर्माण करण्यात आणखी हातभार लावलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शहरातील इतर दोन विधानसभा मतदारसंघापेक्षा दहा वर्षे मागे गेला आहे. आमदार महेश लांडगे व त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी मतदारसंघात कामे करण्यापेक्षा टेंडरवरच जास्त लक्ष दिले. त्यातून या दोघांनी स्वहित साधून घेतले. त्यांच्या खाबुगिरीमुळे भोसरी मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत मागासच राहिला आहे.   
 
आमदार महेश लांडगे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून आपले नाव सांगावे लागत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच आमदाराने किंबहुना राज्य सरकारने सुद्धा आजपर्यंत केली नसेल, एवढी जाहिरातबाजी आमदार महेश लांडगे यांना करावी लागली आहे. त्यांनी मतदारसंघात १० वर्षात कामे केली असती तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. याबाबत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महेश लांडगे यांच्याविषयी मतदारांमध्ये असलेल्या नकारात्मकतेचा फटका भाजपला बसणार आहे. हा फटका केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातच नाही तर पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात सुद्धा भाजपला किंमत मोजावी लागणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या संभाजी महाराज पुतळा प्रकरणातील भ्रष्टाचार हा तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसाठी विरोधी वातावरण तयार करणारी ठरू शकते. या भ्रष्टाचारात आमदार महेश लांडगे यांचे नाव आले आहे. 
 
या सर्व बाबींचा विचार करून भाजपने भोसरी मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये. त्यांचा या मतदारसंघात पराभव होणार हे या मतदारसंघातील राजकीय जाणकार तसेच पक्षाचे पदाधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाने या मतदारसंघात दुसरा उमेदवार द्यावा. महेश लांडगे वगळून पक्षातील अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात विजय पक्का होईल. आमदार महेश लांडगे यांची या मतदारसंघात दहशत आहे. पक्षातील पदाधिकारी सुद्धा त्यांच्या दहशतीखालीच वावरत असतात. त्यामुळे पक्षातील अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याने निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर मला उमेदवारी द्यावी. भोसरी विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने लढेन व पक्षाला विजय मिळवून देईल, याची मी पक्षाला खात्री देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”  
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button