बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा संतापजनक प्रकार; आधी केली बेकायदेशीर तडीपारी, आता रात्री-अपरात्री जाऊन काढतात घरातील महिलांचे फोटो

वरिष्ठ अधिकारी म्हणतात आम्ही खात्री करणार

Spread the love
पिंपरी : राजकारण्यांच्या दबावाखाली येत त्यांच्याकडून पैसे घेऊन बेकायदेशीर तडीपारी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांविषयी सर्वांनी संताप व्यक्त करावा, असा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाची बेकायदेशीर केलेली तडीपारी उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. त्यामुळे जळफळाट झालेले पिंपरी-चिंचवड पोलीस तडीपारी रद्द झालेल्या व्यक्तीच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन कुटुंबातील महिलांचे फोटो काढत असल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही.  
 
पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र सरवदे यांच्या कुटुंबाबाबत हा प्रकार घडला आहे. महेंद्र सरवदे हे भोसरीतील बालाजीनगर येथे वास्तव्याला आहेत. ते विविध सामाजिक कामात अग्रेसर असतात. बालाजीनगर हा झोपडपट्टी बहुल भाग असून, येथील गोरगरीब नागरिकांसाठी महेंद्र सरवदे हे विविध प्रकारची सामाजिक कामे करतात. कोरोनासारख्या महामारीत या भागातील नगरसेवक घरी झोपलेले असताना महेंद्र सरवदे यांनी बालाजीनगरमधील गोरगरीब झोपडीधारकांपर्यंत विविध प्रकारची मदत पोहोचवून तेथील नागरिकांची मने जिंकली. महेंद्र सरवदे हे बालाजीनगरमधील नागरिकांमध्ये दिवसेंदिवस पॉप्युलर होऊ लागल्याने माजी नगरसेवक आणि काही राजकारण्यांना ते डोळ्यात खुपू लागले होते. त्यातून महेंद्र सरवदे यांचा काटा काढण्याचे काही राजकारण्यांनी कटकारस्थान आखले. 
 
शहराच्या राजकारणातील “बंटी आणि बबली”ने तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भोसरीतील एका नेत्याने (हाच नेता आता विधानसभेला लढण्याच्या तयारीत आहे) एमआयडीसी भोसरी पोलिसांना हाताशी धरून महेंद्र सरवदे यांना कायमचेच संपवण्याचा डाव रचला. त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना पैसै चारून महेंद्र सरवदे यांना शहरातून तडीपार करण्याचा कट शिजवला. त्यानुसार भोसरी एमआयडीसीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी महेंद्र सरवदे यांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे पाठविला. हा संपूर्ण प्रस्ताव बेकायदेशीर होता. तरी सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचेही हात ओले झाले असल्याने तडीपारीचा बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केला. महेंद्र सरवदे यांना नोटीस पाठवून त्यांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. समाजाचे रक्षकच पैसे मिळाल्यानंतर कसे भक्षक म्हणून काम करतात यातले हे एक उदाहरण आहे. 
 
या बेकायदेशीर तडीपारीविरोधात महेंद्र सरवदे यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. भ्रष्ट झालेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाने सुद्धा ही बेकायदेशीर तडीपारी कायम ठेवली. त्यामुळे महेंद्र सरवदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या बेकायदेशीर कारभाराचा पाढा वाचला. न्यायालयाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना फटकारत महेंद्र सरवदे यांच्यावरील तडीपारीची कारवाई तत्काळ रद्द केली. याप्रकरणात उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सुद्धा पिंपरी-चिंचवड पोलिस “हम करे सो” कायदा या पद्धतीने वागत आहेत. या देशात लोकशाही नाहीच अशा पद्धतीने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा कारभार सुरू आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती या शहरात निर्माण झालेली आहे.
 
महेंद्र सरवदे यांची तडीपारी उच्च न्यायालयाने रद्द केल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा जळफळाट झाला आहे. उच्च न्यायालय आमच्यापेक्षा मोठे आहे काय?, अशा अविर्भावात पिंपरी-चिंचवड पोलिस महेंद्र सरवदे व त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास देऊ लागले आहेत. महेंद्र सरवदे यांच्या बालाजीनगर येथील घरी रात्री-अपरात्री जाणे, त्यांना घराबाहेर बोलावणे, त्यांचा फोटा काढणे, त्यांच्यासोबत दादागिरीची भाषा करणे असे कृत्य एमआयडीसी भोसरीचे पोलिस वारंवार करत आहेत. आमच्या विरोधात न्यायालयात गेलास काय?, अशा भावनेतून एमआयडीसी पोलिसांकडून महेंद्र सरवदे व त्यांच्या कुटुंबियांची छळवणूक सुरू आहे. यासंदर्भात महेंद्र सरवदे यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन मला आणि माझ्या कुटुंबियांना पोलिसांकडून होणारा मानसिक त्रास आणि छळवणूक थांबविण्याची मागणी केली आहे.
या मागणीनंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून महेंद्र सरवदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे. आम्ही काहीही केले तरी, आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी भावना निर्माण झालेल्या एमआयडीसी भोसरी पोलिसांनी संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिसांविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त व्हावा अशी कृती सोमवारी (दि. ८) रात्री केली आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी महेंद्र सरवदे यांच्या बालाजीनगर येथील घरी गेले. महेंद्र सरवदे हे घरी नव्हते. पोलिस कर्मचाऱ्यांनी महेंद्र सरवदे यांच्या मोबाईलवर फोन केला. सरवदे यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी महेंद्र सरवदे यांच्या पत्नीचे फोटो काढले. त्यांच्या पत्नीला दमबाजी करून निघून गेले. दरम्यान, महेंद्र सरवदे हे घरी आल्यानंतर पत्नीने त्यांना पोलिस आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर महेंद्र सरवदे हे पत्नीला घेऊन एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गेले. आधी माझ्यावर तडीपारीची बेकायदेशीर कारवाई करून अन्याय केला. आता माझ्या पत्नीचा काहीही संबंध नसताना तिचे फोटो का काढले?, अशी विचारणा पोलिसांकडे केली. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. मात्र महेंद्र सरवदे यांच्याकडून केवळ तक्रार घेत कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त शहाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महेंद्र सरवदे यांच्या पत्नीचे पोलिसांनी फोटो काढले असतील, तर खात्री करतो एवढेच उत्तर दिले.  
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button