पिंपरी-चिंचवड महापौर निवासस्थानाची मोकळी जागा भाड्याने देताना भ्रष्टाचार; स्वराज्य पक्षाच्या विजय जरे यांचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरांसाठी नियोजित निवासस्थान बांधण्यासाठी निगडी प्राधिकरण येथे आरक्षित जागा आहे. या जागेवर सध्या मोकळे मैदान आहे. ही जागा विविध कारणांसाठी भाड्याने देण्याच्या नावाखाली ‘अ’ क्षेत्रीय कार्यालायचे अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत, असा आरोप स्वराज्य पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे यांनी केला आहे. याप्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात विजय जरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेले नियोजित महापौर निवासस्थानाची एकूण जागा ९० गुंठे असे आहे. त्यापैकी ३० गुंठे जागा प्रति चौरस फूट १० रुपये दराने भाडे तत्त्वावर दिली जाते. परंतु, ही जागा भाड्याने घेणारे ठेकेदार ३० गुंठे जागेचे भाडे भरून महापौर मैदानाचे ९० गुंठे क्षेत्राचा अनधिकृतपणे वापर करत आहेत. त्यामुळे ६० गुंठे क्षेत्रफळाचे प्रती १० रुपये चौरस फूटप्रमाणे मिळणाऱ्या उत्त्पन्नापासून महापालिकेला मुकावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. महापालिकेच्या या आर्थिक नुकसानीला क्षेत्रीय अधिकारी जबाबदार आहेत. क्षेत्रीय अधिकारी आणि ठेकेदार संगतमताने महापौर निवासस्थानाचे मैदान १० ते १५ दिवस किंवा १ महिना भाड्याने दिले जाते. परंतु, भाड्याचा कालावधी संपल्यानंतरही हे मोकळे मैदान अनधिकृतपणे २ ते ३ महिने वापरले जाते. याला संपूर्ण पाठींबा ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी, बीट निरीक्षक व अतिक्रमण विभाग यांचा असतो. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते. त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून महापालिकेचे केलेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हे मोकळे मैदान भाडे तत्त्वावर घेऊन महापालिकेला चुना लावणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”