बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवडमधील महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला; रवि लांडगे यांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याकडून शिक्कामोर्तब
भोसरी मतदारसंघ उद्धव ठाकरे गट लढणार
पिंपरी : भोसरी विधानसभेवर आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला. तसेच भोसरीमध्ये येऊन जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच खासदार संजय राऊत यांनी भोसरी मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार असेल, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, रवि लांडगे हे मशाल चिन्हाचे उमेदवार असतील याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार निश्चित झाला आहे. आता उर्वरित दोन मतदारसंघात महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोसरीतील भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवि लांडगे यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भोसरी विधानसभेवर आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले. तसेच भोसरी मतदारसंघात येऊन सभा घेणार असून, त्यावेळी जे काही बोलायचे ते बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोसरी मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार असेल, असे स्पष्टपणे सांगितले.
खासदार संजय राऊत म्हणाले, “रवि लांडगे यांचे कुटुंब जनसंघात होते. नंतर भाजपमध्ये गेले. ते शिवसेना परिवारात आले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत आहे. रवि लांडगे यांचा पक्षप्रवेश हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. रवि लांडगे यांना शिवसेनेत आल्याचा अजिबात पश्चाताप होणार नाही. भविष्यात आपणाला महाराष्ट्रात ठाकरे २ हे सरकार आणायचे आहे. त्यासाठी भोसरी विधानसभा जिंकणे गरजेचे आहे. भोसरीत शिवसेनेचाच आमदार असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.”
त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार हे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात रवि लांडगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिले आहेत. दोघांनीही एकप्रकारे रवि लांडगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला उमेदवार ठरला आहे. भोसरी मतदारसंघात रवि लांडगे विरूद्ध भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात सामना निश्चित झाला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर बोलताना रवि लांडगे यांनी हिंदूह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी येण्याची संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसेच एक सच्चा शिवसैनिक म्हणून भोसरीतील हुकूमशाही, भ्रष्टाचार, दडपशाही मोडूनच काढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.