बॅनर न्यूज
मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरण; भाजप आमदार महेश लांडगे यांच्या खासगी पीएची पत्रकारांना धमकी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याची बाब काही पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून समोर आणली. ही बातमी देणाऱ्या पत्रकारांना भाजप आमदार महेश लांडगे यांचे खासगी पीए आणि महापालिकेचे ठेकेदार असलेले प्रसाद कुलकर्णी यांनी धमकी वजा फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातून एका पोलीसाने फोन करून पत्रकारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. आता पोलीस आयुक्त खरेच कारवाई करतात का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी, बाऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी सुरूवातीला सुमारे ५ ते ६ कोटी रुपये खर्च करून चौथरा उभारण्यात आला. नंतर आणखी कोट्यवधी रुपये खाण्यासाठी पुतळ्याची जागा बदलण्यात आली. आता मोशी सेक्टर क्रमांक ५ व ८ येथील पीएमआरडीएच्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राच्या जागेत १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी साडेबारा कोटी रुपयांचा चौथरा बांधण्यात येत आहे. १०० फुटी पुतळा उभारण्यात येत असल्याचे सांगत शहरात मोठा गवगवा करण्यात आला. हे करत असताना आधीचे काम आणि नंतरचे काम एकाच ठेकेदाराला देण्यात आले. या पुतळ्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी घाम गाळून कमाविलेले ६० कोटींहून अधिक रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघाचा खरा कारभार पाहिला, तर हा खर्च १०० कोटींपेक्षा जास्त होईल, असे महापालिकेचे अधिकारी खासगीत बोलताना सांगत आहेत.
कोट्यवधींचा खर्च केला जात असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग मोशीतील महापालिकेच्या अत्यंत गलिच्छ जागेत ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याचेही फोटो ३० ऑगस्ट २०२४ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शहरातील काही पत्रकारांनी त्याची बातमी करून सोशल मीडियावर टाकली. या बातम्या व्हायरल झाल्यानंतर भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे पीए आणि महापालिकेचे ठेकेदार असलेले प्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकारांना धमकी वजा फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कशी काय बातमी केली?, बातमी चुकीची असून, ती काढून टाका, असे म्हणत दबाव निर्माण केला.
हा ठेकेदार एवढ्यावरच थांबला नाही, तर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याच्या बातमीचे डिझाईन बनवून काही पत्रकार फेक नरेटिव्ह पसरवीत असल्याचा उल्लेख करीत ते सोशल मीडियावर व्हायरल करून पत्रकारांचीच बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातून एका पोलीसाने पत्रकाराला फोन करून बातमी का दिली म्हणून विचारणा केली. तसेच आता पोलीस पुतळ्याच्या जागेवर जाऊन पंचनामा करणार असून, खोट्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर शहरातील पत्रकार भितीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाचे काम पत्रकारांनी बातम्यांमधून उघड केले. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते व ठेकेदार यांच्याकडून संबंधित पत्रकारांना धमकी वजा फोन करण्यात आले आहेत. ही बाब गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करून पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामठे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ही महापालिकेवर येते. असे असताना भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे खासगी पीए आणि महापालिकेचे ठेकेदार असलेले प्रसाद कुलकर्णी यांनी पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्यासंदर्भात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना धमकी वजा फोन करण्याचे कारण काय?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रसाद कुलकर्णी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ठेकेदार आहेत. महापालिकेच्या पर्यावरण विभागाची अनेक कामे प्रसाद कुलकर्णी यांची ठेकेदार कंपनी करीत आहे. महापालिकेच्या वर्तुळात प्रसाद कुलकर्णी यांना पर्यावरण विभागाचे जावई असेही संबोधले जाते. ते महापालिकेत आमदार महेश लांडगे यांचा खासगी पीए म्हणूनच वावरत असतात.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी असे काही झालेच नाही असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यामध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी खोटे स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले. पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवलेल्या जागेची कोणीही पाहणी केल्यास संताप होईल, असे तेथील चित्र होते. तसेच पुतळ्याच्या मोजडीलाही तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रांझ धातुचा पुतळा बनविण्यात येत असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे. ब्रांझ धातू हा कठीण असतो. मग पुतळ्याच्या मोजडीला तडे कसे काय गेले?, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर पुतळा फायबर मिलावटीचा असल्याचे विधान केले आहे. आता मोशी येथे बसविण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा ब्रांझ धातूचा सांगून फायबर मिलावटीचा उभारण्याचा घाट घालण्यात येत होता का?, याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.