पिंपरी चिंचवड
पिंपरी मतदारसंघात महायुतीकडून तेजस्विनी कदम?; दोन महिलांमध्ये होणार सामना

पिंपरी : महायुतीच्या विधानसभा निवडणूक जागा वाटपात पिंपरी मतदारसंघावर भाजपने यापूर्वीच दावा केला आहे. त्यानंतर या मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवार असू शकतो याची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार अमित गोरखे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता भाजपमधील उच्चशिक्षीत युवा चेहरा म्हणून तेजस्विनी कदम यांचे नाव प्राधान्याने पुढे येत आहे. तेजस्विनी कदम यांनीही मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार असलेल्या या मतदारसंघासाठी तेजस्विनी कदम अजितदादांच्याही संपर्कात असल्याची चर्चा आहे. एकंदरीत तेजस्विनी कदम यांच्या एंट्रीमुळे पिंपरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे पिंपरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्याऐवजी तेजस्विनी कदम या महायुतीच्या उमेदवार ठरल्या, तर निवडणुकीत दोन महिलांमध्ये सामना रंगण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा पिंपरी-चिंचवडमधील एकमेव राखीव मतदारसंघ आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालेला आहे. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवार गटाचे आहेत. महायुतीच्या जागा वाटपात पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने यापूर्वीच दावा केला आहे. या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असल्याचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने हा मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांची आहे. जर पिंपरी विधानसभा मतदारसंघ भाजपला द्यायचा झाला, तर भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर लढण्याची तयारी करीत असलेले अमित गोरखे यांची पक्षाने नुकतीच विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. त्यामुळे गोरखे यांच्यानंतर पिंपरी मतदारसंघात भाजपकडून लढण्यासाठी युवा चेहरा म्हणून तेजस्विनी कदम यांचे नाव प्राधान्याने पुढे येत आहे.
तेजस्विनी कदम यांची राजकारणाची सुरूवात ही भाजपमधूनच झाली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर आणि एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्या तेजस्विनी कदम या उच्चशिक्षित असून, त्यांनी आतापर्यंत भाजपमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रदेश पातळीवरही त्यांनी काम केले आहे. राज्य पातळीवरील भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात तेजस्विनी कदम यांच्या नावाला भाजपमध्ये पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. तेजस्विनी कदम यांनीही पिंपरी मतदारसंघात लढण्यासाठी रणशिंग फुंकत प्रत्यक्ष मैदानात संपर्क वाढविला आहे. त्यांनी मतदारसंघातील विविध संस्था, संघटना तसेच थेट नागरिकांपर्यंत पोहोचून प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. त्यांना नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असल्याने पक्षाचा एक आश्वासक युवा चेहरा म्हणून तेजस्विनी कदम यांना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोठे पाठबळ मिळत आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे तेजस्विनी कदम यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नुकतीच भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत त्यांनी पिंपरी मतदारसंघात मी उमेदवार असल्यास महायुतीचा विजय कसा होऊ शकतो, याबाबत अजितदादांना माहिती दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे पिंपरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीने तेजस्विनी कदम यांना मैदानात उतरविल्यास पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना दोन महिलांमध्ये होणारी लक्षवेधी लढत पाहायला मिळू शकते.