शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रकडून आळंदीत वारकऱ्यांची आरोग्य सेवा करून आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रच्या वतीने आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिबीरात सहभागी वारकऱ्यांना फळ वाटप करण्यात आले.
शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आळंदीत आयोजित मोफत आरोग्य शिबीरात पाच हजारहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात आले. शिबीरात सहभागी सर्व वारकऱ्यांना फळांचे मोफत वाटप करण्यात आले. निरोगी राहण्याचा संकल्प वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी केला. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच सनराईज मेडिकल फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या सहयोगाने वारकऱ्यांसाठी हे शिबीर राबविण्यात आले.
यावेळी संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर वीर, डॉ. बधे, संतोष कांबळे, शंतनू कांबळे, शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्य प्रमुख डॉ. सतीश दत्तात्रय कांबळ आदी उपस्थित होते.