बॅनर न्यूज
पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर
बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे राजकारणातील बिल्डर, ठेकेदारांचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला एक प्रकारे विरोध केला होता. मात्र पिंपरी मतदारसंघाचा आमदार हा बिल्डर आणि ठेकेदारांचा ऐकणारा आणि त्यांची कामे करणारा असावा यासाठी बहल अण्णा बनसोडे यांना विरोध करीत होते, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवत योगेश बहल यांचे सर्व राजकीय मनसुबे उधळून लावल्याचे चित्र आहे.
राज्याच्या राजकारणात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती आहे. हे तीनही राजकीय पक्ष विधानसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढणार आहेत. त्यानुसार या तीनही पक्षांमध्ये महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे वाटप झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीमध्ये तीनपैकी भोसरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजप लढविणार असून, पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढविणार आहे. भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप, तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. २०२९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे निवडून आले आहेत. या मतदारसंघात दोनवेळा बनसोडे यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा एकदा पक्षाची उमेदवारी मिळेल अशी राजकीय चिन्हे दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आलेल्या राजकीय संकटकाळात अण्णा बनसोडे हे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे अजित पवार अण्णा बनसोडे यांना तिसऱ्यांदा आमदार करतील, असे सांगितले जात होते.
मात्र स्थानिक पातळीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघात वेगळेच राजकीय कट रचले जात होते. शहरातील अनेक बिल्डर तसेच राजकारणातील बिल्डर आणि ठेकेदार असलेले काही माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करीत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड होताच माजी महापौर योगेश बहल यांनी पत्रकार परिषद घेत अण्णा बनसोडे यांच्याबाबत नकारात्मक बाबी सांगून त्यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.