बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या भ्रष्टाचाराचा डायनासोर शरद पवारांच्या भेटीला

Spread the love
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांच्यावर तिकीट मिळविण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. आधी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठमोठे बिल्डर आणि बड्या ठेकेदारांना मध्यस्थी घालायला लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे तिकीट मिळते का हे त्यांनी पडताळून पाहिल्याचे सांगितले जाते. आता त्यांनी सोमवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. राजकीय पक्षांच्या दारोदारी फिरण्याच्या या भटकंतीमुळे त्यांचे राजकीय पितळ उघडे पडले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या भ्रष्टाचाराचा डायनासोर अशी त्यांची प्रतिमा असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध झाले असून, सीमा सावळे यांना पक्षात घेणे म्हणजे शहरात आपल्यासोबतच महायुती किंवा महाविकास आघाडीचे वाटोळे करून घेणे अशी भावना राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता त्या मनसेच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. कोणताच मोठा राजकीय पक्ष उमेदवारी देत नसेल तर त्या शेवटचा पर्याय म्हणून मनसेचे तिकीटावर लढतील अशी शक्यता शहराच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सीमा सावळे या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दोन वेळा शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. २०१४ मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्या शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत गजानन बाबर यांच्या कट्टर कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्या त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहू शकल्या नाहीत. त्यानंतर सीमा सावळे यांनी चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्या भाजपच्या तिकीटावर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर निवडून आल्या. त्यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद देण्यात आले. या पदाच्या माध्यमातून सीमा सावळे यांनी भाजपचेच माजी पदाधिकारी सारंग कामतेकर यांच्यासोबत मिळून संगनमताने २०० ते ३०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आजही होत आहे. या पदाच्या माध्यमातून मिळणारे पैसे पाहून सीमा सावळे यांचे डोळे फिरले आणि ज्यांच्यामुळे हे पद मिळाले ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनाही त्यांनी फसविल्याचे आजही शहराच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते.
सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे वेळोवेळी आरोप करण्याची एक मोठी मालिका चालविली. पण महापालिकेत सत्तेत येताच आणि स्थायी समितीचे सभापतीपद मिळाल्यानंतर या जोडीने भ्रष्टाचाराचा इतका धुमाकूळ घातला की त्यांच्याविषयी काही जणांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. मात्र आजपर्यंत या तक्रारींची चौकशी झालेली नाही. भाजपचा भ्रष्टाचार कसा दाबला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणून सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांचे फक्त पासपोर्ट तपासले तरी यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आणि काळ्या पैशांतून जगातील किती देश हे फिरून आले हे समोर येऊ शकते. मात्र भाजपला आपला भ्रष्टाचार दिसत नाही हे राजकीय वास्तव आहे.
भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील करदात्या नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूट केल्यानंतर या दोघांनीही भाजपच्याच विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे भाजपने गेल्या काही वर्षांपासून या दोघांना चार हात लांब ठेवणेच पसंत केले आहे. भाजपच्या नगरसेविका असूनही सीमा सावळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. तेथील मतदारांनी सीमा सावळे यांचे डिपॉझीट जप्त केले होते. तेव्हापासून त्या कोणत्या राजकीय पक्षात आहेत हेच कोणाला सांगता येत नव्हते. आता त्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी पिंपरी मतदारसंघातील मतदारांना साड्या वाटून विकत घेण्याचाही प्रयत्न केला. त्या कोणत्या राजकीय पक्षाकडून लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट होत नाही.
पिंपरी मतदारसंघात लढण्यासाठी कोणी तिकीट देता का तिकीट असे म्हणत सीमा सावळे या विविध राजकीय पक्षांच्या दारोदारी फिरत असल्याचे चित्र आहे. या तिकाटीसाठी लोकांचे शोषण करून भ्रष्टाचारातून कमावलेले कोट्यवधी रुपये मोजण्याचीही त्यांची तयारी असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील अनेक मोठे बिल्डर, ठेकेदार आणि काही भाईंना हाताशी धरल्याचे बोलले जात आहे. हे सर्वजण सीमा सावळे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राजकीय लॉबिंग करत असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही राजकीय पक्षाकडून तिकीट मिळणे अवघड असल्याचे दिसत असल्याने सीमा सावळे यांनी अखेर सोमवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सीमा सावळे यांचे राजकीय पितळ उघडे पडले आहे. राजकारणात विश्वासार्हता गमावलेल्या सीमा सावळे यांना कोणताच राजकीय पक्ष थारा देत नसल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. सीमा सावळे यांना पक्षात घेऊन पक्षाचे दीर्घकालीन राजकीय नुकसान करून घेण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाचा नेता तयार नसल्याचे राजकीय वास्तव आहे. 
 
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी गेल्या आठवड्यात चिंचवड मतदारसंघात घेतलेल्या मेळाव्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शहरात भ्रष्टाचार करणारे डायनासोर निर्माण झाले आहेत, असा आरोप केला होता. सीमा सावळे यांनी महापालिकेत केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे त्यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचा डायनासोर म्हणूनच पाहिले जाते. हा भ्रष्टाचाराचा डायनासोर पक्षात घेऊन पिंपरी मतदारसंघात निवडणुकीचे तिकीट देणे म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना अभय देणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण होणार आहे. त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडी यातील कोणत्याही राजकीय पक्षाने सीमा सावळे यांना उमेदवारी दिल्यास शहरातील तीनही मतदारसंघात केवळ त्या राजकीय पक्षाचीच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या इतर राजकीय पक्षांनाही किंमत मोजावी लागेल याचा अंदाज नेत्यांना आल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट फिरून झाल्यानंतर आता त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या दारात जाऊन उभ्या राहतात हे पाहावे लागणार आहे. 
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button