बॅनर न्यूज

तब्बल ७ हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शरमेची बाब

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे चार आमदार...कोट्यवधी खाणारे अधिकारी...पण वायसीएम रुग्णालयात दाताचा एक्सरे काढण्याचे मशीन उपलब्ध नाही

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दातावर उपचार करण्यास येणाऱ्या रुग्णांना उपचाराच्या पूर्ण सुविधा मिळत नाहीत. दंतरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची केवळ तपासणी केली जाते. त्यानंतर रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे यल्लाप्पा वालदोर यांनी वायसीएम रुग्णालयात जाऊन हा सर्व प्रकार समोर आणला. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन देऊन दंत विभागात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यानिमित्ताने प्रत्येक कामात लाखो, करोडोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आणि शहरात चार आमदार असणाऱ्या भाजपला पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्यांशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

वायसीएम रुग्णालयात दातावर उपचार करण्यास गेलेल्या रुग्णांना केवळ तपासणी करून सोडले जात आहे. या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले जात आहे. आम आदमी पक्षाचे यल्लाप्पा वालदोर यांनी रुग्णालयात जाऊन दंत विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रकार समोर आणला आहे. या विभागात दातांचे एक्सरे काढणारी मशीन उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे या विभागाला मुख्य दंततज्ज्ञ सुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे वायसीएम रुग्णालयावर दरवर्षी खर्च केले जाणारे कोट्यवधी रुपये कोण खातेय आणि या रुग्णालयासाठी कोणत्या मशीनरी विकत घेतल्या जात आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे यल्लाप्पा वालदोर यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन देऊन वायसीएम रुग्णालयात दंत विभागात आवश्यक मशीनरी तातडीने बसविण्याची मागणी केली आहे. खासगी रुग्णालयात दातावर उपचार करणे अत्यंत महाग बनले आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्ण दातावरील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येत असतात. परंतु, श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या महापालिकेला वायसीएम रुग्णालयात दातावर उपचार करणारी यंत्रणा उपलब्ध करता येत नसेल तर ही शरमेची बाब असल्याचे वालदोर यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथे प्रशस्त वायसीएम रुग्णालय आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून हे रुग्णालय भ्रष्टाचाराचे डायनासोर बनले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत वायसीएम रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचाराचा गॉडजिला बनला आहे. रुग्णालयासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने मलाई खात असल्याचे उघड गुपित आहे. दरवर्षी वायसीएम रुग्णालयावर पिंपरी-चिंचवडमधील करदात्या नागरिकांचे १०० कोटींहून अधिक खर्च केले जातात. त्यातील निम्मे अधिकारी आणि ठेकेदार मिळून खातात. इतके खाऊन सुद्धा या अधिकाऱ्यांना वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उत्तम आणि दर्जेदार रुग्णसेवा द्यावी, असे वाटत नाही. वायसीएम रुग्णालय म्हणजे केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, असेच चित्र आहे. या रुग्णालयात रुग्णसेवेपेक्षा अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचीच जास्त चर्चा होत असते.

महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ७ हजार कोटी रुपयांचा आहे. हजारो कोटी असूनही महापालिकेला वायसीएम रुग्णालयात दंत विभागात एक्सरे मशीन उपलब्ध करून देता येत नाही. ही मशीन खरेदी केल्यास आपल्याला किती लाख मिळतील याचे अधिकारी आणि काही आमदारांचे गणित जुळत नसल्यामुळेच एक्सरे मशीन उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना केवळ पैसे खाण्यातच अधिक रस आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या घरचे पाणी भरणाऱ्या या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यात पैसे खाल्ले, तिथे दातावर उपचार करण्यास येणाऱ्या रुग्णांना ते गांभीर्याने काय घेतील?, असे आता बोलले जात आहे. यानिमित्ताने प्रशासकीय राजवटीत कसा कारभार सुरू आहे हे समोर आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button