बॅनर न्यूज

वाकडमधील नवीन शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या; भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथे माध्यमिक विद्यालयासाठी नव्याने इमारत बांधण्यात आलेली आहे. या विद्यालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वाकड येथील सर्व्हे क्र. १७२ येथे माध्यमिक विद्यालयासाठी (एसएस ४/२३) नव्याने शाळा इमारत बांधण्यात आलेली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये शहरातील गोरगरीब व वंचित कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. या मुलांना आपल्या देशाच्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास अगदी लहान वयातच समजला तर मुलांना शिक्षणात गोडी वाढेल. हीच मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या मुलांच्या डोळ्यासमोर सतत राष्ट्रपुरूषांची नावे राहायला हवीत. त्यामुळे वाकड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शाळेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे उचित ठरेल.
ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते. समाजात दरिद्रता, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता खच्चून भरलेली होती. समाज पिळवणूक, फसवणूक, कर्मठता अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. अशा काळात थोर समाजसेवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. आज समस्त स्त्रीवर्ग सावित्रीबाईंचा ऋणी आहे. आज त्यांच्यामुळेच समाजातून चूल व मूल या संकल्पनेमध्ये बांधली गेलेली स्त्री हातात पेन व पुस्तक घेऊन स्वतः शिक्षित तर झालीच पण त्याचबरोबर तिने साऱ्या समाजाला ही शिक्षित केले आहे. सावित्रीबाई फुले यांकडून मिळालेले शिक्षण हे समस्त स्त्री वर्गासाठी एक वरदान आहे. हे वरदान आजही समाजाला कायम प्रेरणा देत राहावे यासाठी वाकड येथील नवीन शाळेला थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button