बॅनर न्यूज

“तुम्ही पक्षाच्या वाईट काळात पळून जाणारे”; शरद पवारांचे सूचक वक्तव्य, भोसरी मतदारसंघातील माजी नगरसेवक “गॅस”वर

Spread the love
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही माजी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. त्याची पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. विधानसभेची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी ही भेट घेतली होती. या भेटीत शरद पवार यांनी “तुम्ही पक्षाच्या वाईट काळात पळून जाणारे लोक आहात. आधी पक्षप्रवेश करा, विधानसभेचे नंतर बघू”, असे सूचक वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्यातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ शरद पवार गटाला मिळणार नसल्याचे स्पष्ट राजकीय संकेत मिळत आहेत. त्यामुळे शरद पवार यांची भेट घेणारे भोसरी मतदारसंघातील माजी नगरसेवक राजकीय बुचकळ्यात पडले आहेत. विधानसभेची उमेदवारीच मिळणार नसेल, तर अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटात प्रवेश करावा की नाही अशी संभ्रमावस्था या माजी नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ५ जुलै रोजी हे नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. २०१४ नंतर भाजपने हा बालेकिल्ला काबीज करून अजित पवार गटाला शहरात विरोधात बसायला लावले. एक-दीड वर्षापूर्वी अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ९० टक्के माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्ष फुटीवेळी भोसरीतील माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे शहराध्यक्ष पदावर होते. ते सुद्धा अजित पवार गटासोबतच गेले. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कायम राहिले. अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये एवढा राजकीय दबदबा होता की राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार होत नव्हते. अशा वेळी पिंपळेनिलख येथील भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी राजकीय धाडस करून शरद पवार गटाचे शहराध्यक्षपद स्वीकारले. 
 
पक्षात दोन गट पडल्यानंतर पहिलीच निवडणूक लोकसभेची झाली. या निवडणुकीत अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाची राजकीय कामगिरी सरस ठरली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. ते राजकीय पर्यायाच्या शोधात आहेत. त्यातूनच या माजी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही मोजक्या नगरसेवकांना सोबत घेत ही भेट घेतली. अजित गव्हाणे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळेच गव्हाणे यांनी भोसरी मतदारसंघासाठी शरद पवार यांच्याकडून उमेदवारीबाबत काही शब्द मिळतो का?, याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने ही भेट घेतल्याचे उघड राजकीय गुपित आहे.
मात्र या भेटीत शरद पवार यांनी “पक्षाच्या वाईट काळात तुम्ही पळून जाणारे लोक आहात. आधी पक्षप्रवेश करा, विधानसभेचे नंतर बघू”, असे सूचक वक्तव्य केल्याचे केल्याचे त्यांना भेटलेल्या एका माजी नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शरद पवार यांनी विधानसभेच्या उमेदवारीबाबत कोणताच संदेश या माजी नगरसेवकांना दिला नाही. उलट या माजी नगरसेवकांच्या पळपुटेपणावरच त्यांनी बोट ठेवले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ शरद पवार गटाला मिळणार नसल्याचे स्पष्ट राजकीय संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी भोसरी मतदारसंघातील अजित पवार गटाच्या माजी नगरसेकांचा येत्या ५ जुलै रोजी पक्षात प्रवेश करून घेण्यास सांगितले. मात्र पक्षात प्रवेश करून हा भोसरी मतदारसंघ शरद पवार गटाला मिळणारच नसेल, तर पक्षप्रवेश करून उपयोग काय?, असा प्रश्न या माजी नगरसेवकांना पडला आहे. आता ते ५ जुलै रोजी शरद पवार गटात प्रवेश करतात का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button