बॅनर न्यूज

आमदार महेश लांडगे यांच्या पक्षांतर्गत दादागिरीला भाजप पदाधिकारी व कार्यकर्तेच वैतागले

पक्ष निरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाढा; भोसरी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घेणार वेगळी भूमिका

Spread the love
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर दादागिरी आणि दहशतीचा विरोधकांकडून नेहमीच आरोप होतो. आता खुद्द भाजपमधूनच आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाही व दादागिरीला विरोध होऊ लागला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या पक्ष निरीक्षकासमोरच भोसरी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेश लांडगे हे पक्ष संघटनेला आणि पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना नेहमी फाट्यावर मारतात असे स्पष्टपणे सांगितले. आम्हाला फक्त गर्दी करण्याच्या वेळीच बोलावले जाते. इतर कोणत्याही बैठकांचा साधा निरोप सुद्धा पाठविला जात नाही. भाजप ही संघटनेच्या बळावर मोठी झालेली आहे. आमदार पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजतात. निवडणुकीत आम्ही काम कसे करायचे?, असा सवाल करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भोसरीच्या निवडणुकीत भाजपचे प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  
 
महेश लांडगे हे भोसरी मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षापासून आमदार आहेत. विकासकामांपेक्षा भ्रष्टाचार, दादागिरी आणि दहशत अशी भोसरी मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख जगजाहीर होऊ नये यासाठी भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची सोशल मीडिया टीम प्रचंड भ्रष्टाचारातून उभ्या राहिलेल्या अनेक प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात जाहीरात करून लोकांमध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्याचा आटापिटा करत असल्याचे चित्र आहे. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याचे प्रकरण सुद्धा भ्रष्टाचारामुळेच उद्धवले हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. स्वतःला हिंदूंचे तारणहार म्हणवून घेणारी भाजप या प्रकरणात तोंडाला कुलूप लावून बसली आहे. पत्रकारांनी आवाज उठवला तर आमदार महेश लांडगे यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या ठेकेदारांनी धमकीवजा फोन करून प्रकरण दाबून टाकले. विशेष म्हणजे हे प्रकरण आणखी बाहेर येऊ नये यासाठी पोलिसांचा सुद्धा गैरवापर केला गेला. 
 
भोसरी मतदारसंघातील भ्रष्टाचाराची अशी अनेक प्रकरणे गाजत आहेत. या प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या टीमची मतदारसंघातील दहशत, भ्रष्टाचार आणि दादागिरी हा विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरत आहे. विरोधकांकाडून होणारा हा आरोप भोसरी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच खरा ठरविला आहे. भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रदीपसिंह जडेजा यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी गुरूवारी भोसरी मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोरवाडी येथील कार्यालयात बैठक घेतली. माजी खासदार अमर साबळे, आमदार अमित गोरखे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस शैला मोळक, अजय पाताडे यांच्यासह भोसरी मतदारसंघातील महेश लांडगे गटाचे पदाधिकारी वगळता पक्षाचे सर्व निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
सर्वांनी पक्ष निरीक्षकांसमोर आमदार महेश लांडगे यांच्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. लांडगे हे पक्षाच्या प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेहमी फाट्यावर मारतात. त्यांनी पक्ष संघटनेला खुंटीवर टांगली आहे. मीच म्हणजे पक्ष संघटना असा त्यांचा समज झाला आहे. गेल्या दहा वर्षात आम्हाला फक्त गर्दी दाखविण्यासाठी बोलावले गेले. पक्षाच्या कोणत्या बैठकांचा निरोप येत नाही. बुथ स्तरावरील बैठकांना सुद्धा बोलावले जात नाही. डमी कार्यकर्ते उभे करून भाजपचे असल्याचे दाखविले जाते. भोसरी मतदारसंघात शहर संघटनेतील तीन-तीन सरचिटणीस आहेत. त्यांना अजिबात विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी केवळ पदाधिकारी म्हणूनच मिरवायचे का?, संघटनेचे कोणते काम करायचे नाही का?, असा सवाल करत महेश लांडगे यांच्या पक्ष संघटनेबाबतच्या कारभाराबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाढाच वाचल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते वेगळी भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे.  
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button