बॅनर न्यूज

भोसरी मतदारसंघात पब्लिक डिमांड; महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रवि लांडगे यांना तब्बल ७१ टक्के नागरिकांची पसंती

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे यांना महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार म्हणून तब्बल ७१ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने भोसरी मतदारसंघासाठी सात दिवस केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात फक्त रवि लांडगे यांचाच बोलबाला दिसून आला आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात ९ हजार ६५२ लोकांनी सहभाग नोंदविला. त्यातील तब्बल ६ हजार ८५३ लोकांनी रवि लांडगे हे उमेदवार असतील, तरच भोसरीत महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचे मत व्यक्त केले आहे. या मतदारसंघातील दुसरे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांना २९ टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पसंती दिली आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा सर्वाधिक धूर निघणाऱ्या भोसरी मतदारसंघात यंदा लांडगे विरूद्ध लांडगे लढत पाहायला मिळते की रवि लांडगे यांच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार असल्यास केवळ नुरा कुस्ती पाहायला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

यंदाची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत असली तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या स्वतंत्र लढण्याच्या घोषणेमुळे बहुरंगी लढती पाहायला मिळू शकतात. मात्र यात भोसरी विधानसभा मतदारसंघ अपवाद ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात केवळ महाविकास आघाडी आणि महायुती असाच थेट सामना रंगणार आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हेच महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बिनविरोध नगरसेवक झालेले रवि लांडगे आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे दोन चेहरे महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत आहेत. या दोघांव्यतिरिक्त अन्य अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ते आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात लढण्याइतके तुल्यबळ उमेदवार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून भोसरी मतदारसंघात रवि लांडगे की अजित गव्हाणे यांपैकी उमेदवार कोण असेल याबाबत प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.

उमेदवाराची उत्सुकता असली तरी, भोसरी मतदारसंघातील नागरिकांना महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा असे वाटते हे जाणून घेण्यासाठी “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने ऑनलाईन सर्वेक्षण केले. सात दिवस केलेल्या या ऑनलाईन सर्वेक्षणात भोसरी मतदारसंघात रवि लांडगे यांचाच डंका वाजत असल्याचे चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणात एकूण ९ हजार ६५२ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यातील तब्बल ७१ टक्के म्हणजे ६ हजार ८५३ लोकांना रवि लांडगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तरच विजयाची पक्की खात्री वाटत आहे. दुसरे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांच्या नावाला २९ टक्के म्हणजे २ हजार ७९९ लोकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पसंती दिलेली आहे. 

भोसरी मतदारसंघातील नागरिकांचा हा ऑनलाईन कौल विद्यमान आमदार महेश लांडगे यांची झोप उडविणारा आहे. कारण भाजपचे नगरसेवक असूनही नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून भोसरी मतदारसंघातील चुकीच्या कारभाराला रस्त्यावर उतरून उघडपणे विरोध करणारे रवि लांडगे हे पहिले नगरसेवक आहेत. नागरिकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून भोसरीत मोठे रुग्णालय उभारले आहे. आमदार व त्यांच्या कंपूने महापालिका प्रशासनाला हाताशी धरून या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव रचला होता. मात्र रवि लांडगे हे गोरगरीब नारिकांच्या आरोग्याच्या हिताचा दूरदृष्टीने विचार करून जनतेलाच घेऊन रस्त्यावर उतरले. त्यामुळे जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपूचा डाव फसला. आज हे रुग्णालय स्वतःकडे रुपयाही नसणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मोठा आधार बनले आहे. जर त्यावेळी भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण झाले असते, तर संपूर्ण शहरातच चुकीचा पायंडा पडला असता. लुटणाऱ्या कंपूने महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण केले असते. आज मोफत मिळणारे उपचार गोरगरीबांना पैसे मोजून घ्यावे लागले असते. जनतेचे हे पैसे रुग्णालय चालविणारे ठेकेदार आणि खासगीकरणाचा निर्णय घेणारे राजकारणी यांच्या घशात गेले असते. त्यामुळे रवि लांडगे यांनी त्यावेळी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला केलेला विरोध संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब रुग्णांच्या हिताचा ठरला आहे.  

आमदार महेश लांडगे गटात अस्वस्थता

त्यावेळी केवळ ट्रेलर दाखवून विधानसभा निवडणुकीची वाट पाहणारे रवि लांडगे यांनी आता विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. ते महाविकास आघाडीकडून भोसरी मतदारसंघात लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात गाठीभेटी घेत प्रचाराचा एक दौराही पूर्ण केला आहे. त्यांच्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून तुफान प्रतिसाद लाभत आहे. रवि लांडगे यांच्यासारखा गेमजेंचर उमेदवार मैदानात उतरल्याने नागरिक आणि तरुणाईतही प्रचंड उत्साह संचारल्याचे दिसत आहे. मतदारसंघातील भ्रष्टाचार, दादागिरी आणि दहशतीला यंदा गाडायचेच अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या गटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button