बॅनर न्यूज

भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; रवि लांडगे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

रवि लांडगे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा

Spread the love
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले माजी नगरसवेक रवि लांडगे यांनी आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे भोसरी मतदारसंघात रवि लांडगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे महेश लांडगे विरूद्ध रवि लांडगे अशी लढत होईल, असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी रंगणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झालेली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत ही उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे. या मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांचे नाव महाविकास आघाडीकडून सर्वाधिक चर्चेत आहे. रवि लांडगे यांनी दोन अडीच वर्षापूर्वीच भाजपला रामराम केला आहे. त्यानंतर त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. आता ते विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी भोसरी मतदारसंघात प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यांच्या प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे रवि लांडगे यांचासारखा दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही हे राजकीय वास्तव आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी हे इच्छुक भाजपला मॅनेज होतील, असे बोलले जात आहे. भोसरीत महाविकास आघाडीने रवि लांडगे यांच्याशिवाय अन्य कोणताही उमेदवार दिला, तर भाजपसोबत फक्त नुरा कुस्ती पाहायला मिळेल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे रवि लांडगे यांच्याकडे महाविकास आघाडीचा हुकमी एक्का म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. त्यातून ते महाविकास आघाडीतील कोणत्या राजकीय पक्षाकडून भोसरी मतदारसंघात लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 
 
या पार्श्वभूमीवर रवि लांडगे यांनी आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. रवि लांडगे यांनी संजय राऊत यांच्यासोबत भोसरी मतदारसंघातील निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यांनी भोसरी मतदारसंघातून मशाल चिन्हावर लढण्याची तयारी दाखविली असल्याचे समजते. या दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर रवि लांडगे हे भोसरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यामुळे शिवेसना उद्धव ठाकरे गटातही उत्साहाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. रवि लांडगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात आल्यास विधानसभा जिंकूच, पण महाविकास आघाडी म्हणून आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिका देखील जिंकून दाखवू, असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका स्थानिक नेत्याने व्यक्त केला. 
 
दरम्यान, रवि लांडगे हे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवि लांडगे यांचे कुटुंबीय भाजपचे शहरातील निष्ठावान म्हणून ओळखले जातात. या शहरात भाजप रुजविण्यात आणि वाढविण्यात लांडगे कुटुंबियांनी मोठे राजकीय योगदान दिलेले आहे. मात्र पाच वर्षे नगरसेवक असताना रवि लांडगे यांना भाजपने महापालिकेत कोणतेही मानाचे स्थान दिले नाही. ना कोणते पद दिले ना कोणत्या विकासकामांमध्ये त्यांना विश्वासात घेण्यात आले. ते स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छुक असताना आमदार महेश लांडगे यांनी रवि लांडगे यांना डावलून जवळचे नातेवाईक असलेल्या नितीन लांडगे यांना पद दिले. स्थायी समिती सभापतीपदाचा शब्द देऊन आमदार महेश लांडगे यांनी फसविल्याचा जाहीर आरोप रवि लांडगे यांनी त्यावेळी केला होता. आता रवि लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्यामुळे आमदार महेश लांडगे बॅकफूटवर गेल्याचे राजकीय चित्र आहे.   
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button