बॅनर न्यूज
अबब! भोसरीतील व्यक्तीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या पैशातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल

पिंपरी : भोसरीतील एका व्यक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारातून लंडन येथे तब्बल २०० कोटींचे हॉटेल उभारल्याचे वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे भोसरीमध्ये दरवर्षी इंद्रायणी थडी भरविली जाते. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे तब्बल १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरी देखील इंद्रायणी नदीची गटारगंगा झाल्याचे सांगत खासदार अमोल कोल्हे यांनी हे १४०० कोटी रुपये गेले कुठे?, असा सवाल केला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या नावाने नागरिकांना भावनिक करून कोट्यवधी रुपये खातो कोण?, याच भ्रष्टाचाराच्या पैशातून भोसरी विधानसभा मदारसंघात मोठमोठे इव्हेंट घेऊन नागरिकांना इतकी वर्षे फसविले जात आहे का?, असे अनेक प्रश्न भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पडले आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. शुक्रवारी (दि, ९) ही यात्रा भोसरी विधानसभा मतदारसंघात आली होती. भोसरीत झालेल्या जाहीर सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची काही मोजक्या प्रकरणांचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. भोसरीतील एका व्यक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल उभारल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र खासदार कोल्हे यांनी भोसरीतील तो व्यक्ती कोण याचे नाव उघड केले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या पैशातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल उभारणारा तो व्यक्ती कोण याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेत केलेल्या भाषणात लंडनमधील २०० कोटींच्या हॉटलसोबतच भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणावरून भाजपला घायाळ करून टाकले आहे. त्यांनी आपल्या भाषणात भोसरीतील शितलबाग येथील लोखंडी पादचारी पुलासाठी ७० लाखांवरून ७ कोटी खर्च करण्यात आल्याचा उल्लेख केला. आमदार महेश लांडगे हे स्थायी समिती सभापती असताना या खर्चाला मंजुरी देण्यात आली हे सत्य आहे. त्यांनीच या पुलाच्या खर्चाला सभापती म्हणून ७० लाखांवरून ७ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पुलाचा खर्च ७० लाखांवरून ७ कोटी कसे काय झाले बुवा?, २४ कॅरेट सोन्याचा हा पूल आहे का?, याचे उत्तर आता आमदार महेश लांडगे यांना निवडणूक प्रचारादरम्यान द्यावा लागेल, अशी राजकीय परिस्थिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्माण केली आहे.
त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघात दरवर्षी इंद्रायणी थडी जत्रा भरविली जाते. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देहू आणि आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या नावाने इंद्रायणी थडी जत्रा भरविली जाते. या नदीच्या स्वच्छेतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल १४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हजारो कोटी खर्च करून इंद्रायणी नदीचे पिंपरी-चिंचवडमधील स्वरूप गटारगंगा अशीच आहे. मग हे १४०० कोटी रुपये गेले कुठे?, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये प्रक्रिया करून सोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागोजागी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. हे एसटीपी चालविण्याचे कंत्राट एका ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. हा ठेकेदार सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच घाण पाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षरीत्या आपल्या भाषणात सांगितले. याचा अर्थ सांडपाण्यावर प्रक्रिया न करता प्रक्रिया केल्याचे कागदोपत्री दाखवून त्यातून तब्बल १४०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे खासदार कोल्हे यांना सांगायचे आहे. हा ठेकेदार एका भाजप आमदाराच्या अवतीभवती फिरणारा असून, शहरातील सर्व राजकारण्यांना त्याच्याविषयी माहिती आहे.
याशिवाय खासदार कोल्हे यांनी अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटच्या नावाखाली नागरिकांच्या तोंडाला पाने पुसून तब्बल ४५ कोटी रुपये लाटण्यात आल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५० शाळा ई-लर्निंग करण्याच्या नावाखाली ४३ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचेही खासदार कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व भ्रष्टाचारातून लंडन येथे २०० कोटींचे हॉटेल सुरू करण्यात आल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अप्रत्यक्ष सुचवायचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता होती. भाजपच्या सत्ता काळात सर्वाधिक खर्च हा भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेला आहे. खर्चाचा हा आकडा भाजपने जाहीर केल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांवर त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती आहे. कारण झालेला खर्च आणि मतदारसंघातील परिस्थिती पाहिल्यास नागरिकांचा भ्रमनिरास होणार हे नक्की आहे. अशा परिस्थितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भ्रष्टाचाराच्या केवळ दोन-तीन प्रकरणांचा उल्लेख करून विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा स्पष्ट केला आहे. आता भाजप पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल उभारलेला तो व्यक्ती कोण हे शोधून काढून ईडीमार्फत कारवाई करते की हे विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह आहे म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा राजकीय भुलभुलैय्या करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.