स्वप्नांना पंख देणारी…… शाळा
आज अख्खं गाव उल्हासात आनंदात न्हावून गेलं होतं. हो आमचं पुसाणे गाव !गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कधी नव्हे ते …आमच्या गावातल्या शाळेला माननीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हा स्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता . हो अगदी खरंच….. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळांमधून प्रथम क्रमांक…… भूतकाळात न घडलेलं आज वर्तमानात करुन दाखवलं होतं आमच्या शाळेनी…… यामुळे गावातील सर्व महिला ,पुरुष ,तरुण मंडळे ,मुले- मुली असे सगळेच देवळासमोर जमून विद्यार्थ्यांची व शिक्षकांची वाट पाहत होते.
जसा शाळेच्या मुलांचा टेम्पो गावात आला तसे ढोल -ताशे वाजू लागले .आनंदाचा गुलाल सर्वांच्या अंगावर पडू लागला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. आज सर्व गावकरी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मन भरून कौतुक करत होते. हा कौतुक सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. शाळेला मिळालेले यश हे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मेहनतीचे फळ होते.
अशा घटना आपल्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या असतात. या अशा घटनांमुळे मुलांच्या सामाजिक व भावनिक विकासाचा पाया शाळेतच रचला जात असतो . तसे पाहता शाळा खरंच विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देते का ? तर हो प्रत्येक मूल हे अद्वितीय व एकमेव असते. प्रत्येक मुलात अष्टपैलू पैकी एक तरी गुण हा लपलेला असतोच असतो . गरज असते ती फक्त त्या मुलांच्या गुणांना ओळखण्याची ,त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्याची, आणि हे काम करते ते अर्थातच आपले जिल्हा परिषदेची शाळा .ज्या शाळेमध्ये विद्यार्थी मन मोकळेपणाने व आनंदाने अनेक अध्ययन अनुभव घेत असतात . लहान मुलाचे मन हे खूप नाजूक असतं ते मन जपणं हे शाळेचे शिक्षकाचे काम असते आणि ते काम शिक्षक अत्यंत सहजतेने पार पाडत असतात.
शालेय जीवनात जी मुले उच्चतम शैक्षणिक प्रगती प्राप्त करतात ते यशस्वी होतात पण काही मुले निम्नतम प्रगतीवरच थांबतात .अशावेळी ती मुले एकतर नाईलाजाने शाळेत येतात . त्यांना शाळेमध्ये अजिबात रस वाटत नाही आणि ते शाळेच्या प्रवाहातून बाहेर फेकले जावू शकतात. त्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागू शकतं. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी शाळेतील विविध स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम सहशालेय उपक्रम यांचा खूप उपयोग होत असतो.
पुणे जिल्ह्यातील यशवंतराव कला क्रीडा स्पर्धा ही एक त्यातीलच. आज पुणे जिल्ह्याच्या शालेय गुणवत्तेचा आलेख पाहता या स्पर्धांमुळे मुले इंग्लिश मेडियम पेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आनंदाने येताना रमताना ,टिकताना आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेताना दिसत आहेत. अशा उपक्रमामुळे मुलांमधील अनेक गुणांचा विकास सतत होत असताना आपण पाहतो .
शाळेतील स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच असते अनेक कलागुणांचे दिवे त्यांच्या मनात पेटतात आणि तेवत राहतात . त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभराचा प्रकाश देत असतात. भावी जीवनातील संकटांना तोंड देताना हीच कला त्यांच्या कामी येते. त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देत राहते.
शैक्षणिक जीवनातील सांस्कृतिक कार्यक्रम ही एक संधीच असते , त्यामुळे विद्यार्थी नाट्य ,नृत्य ,गायन , वादन, नेपथ्य, दिग्दर्शन अशा आवडीच्या गोष्टी मनापासून करतात. त्यामुळे ते या काळात शिक्षकांच्या अगदी जवळ येतात .अर्थातच त्यामुळे त्यांच्यामधील प्रेम वाढते कला गुणांच्या विकासाबरोबर ते शाळेतील अभ्यास आपसूकच करायला लागतात. त्यामुळे शाळेची ओढ, अभ्यासाची आवड, शिक्षकांविषयी आपुलकी , प्रेम , जिव्हाळा हे आपोआपच निर्माण होत असतो. हे विद्यार्थी आपल्या सुप्त गुणांच्या वाढीमुळे आणि विकासामुळे आपोआपच शैक्षणिक प्रगती सुद्धा साधताना दिसून येतात.
नृत्य नाट्य चित्रकला गायन वादन ही अंतर्मनाची लपलेली भाषा असते हे अनेक कलाप्रकार विद्यार्थ्यांच्या भावनिक अभिव्यक्तीला विधायक स्वरूपात मांडतात. त्यांच्या मनावरील ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन करतात त्यांच्या छोट्या छोट्या चिंता यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात. आणि स्वत्व जपण्यासाठी उपयोगी पडतात. ह्या अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःची जाणीव निर्माण होते ते स्वावलंबी व स्वाभिमानी होत जातात. नाट्यातून संवाद फेक, अभिनय , सहयोग , नेपथ्य , दिग्दर्शन , संगीत याविषयी तर नृत्यातून तरलता, सादरीकरण, अद्वितीय विचारशक्ती,
भावना आणि अभिव्यक्ती सहयोग आणि जोडणी शिस्त आणि प्रभुत्व अशा अनेक गुणांचा संचय यामुळे विद्यार्थ्यांमध्ये होत असतो. नवनवीन तंत्र आणि कौशल्य ते आत्मसात करतात.
सर्जनशीलता व नवनिर्मितीचा आनंद आपोआपच त्यांना मिळत राहतो आणि त्यांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळत राहते .
आपण नेहमी आपल्या घरात पाहतो की लहान मुले जी शाळेत जात असतात त्यांच्या शाळेत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम जेव्हा सुरू होतात , तेव्हा विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही .वेशभूषा करणे, नृत्य करणे अभिनय करणे ह्या असे अनेक गोष्टी त्यांना आवडतात आणि ते आवडीने त्यामध्ये आपला सहभाग नोंदवत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुंदरता ,नीटनेटकेपणा जबाबदारीची जाणीव , नवनिर्मिती ,आनंदी वृत्ती ,खेळाडू वृत्ती अशा अनेक गुण तयार होत असतात.
विविध क्रीडा स्पर्धा यामधून मुलांमध्ये संघ भावना, खेळाडू वृत्ती, नेतृत्व, सहकार्याची भावना आपुलकीची भावना, एक संघ पणा अशा गुणांचा विकास होत राहतो. याच अनुभवांमधून शालेय जीवन हे वृद्धिंगत होत असतं. शाळेमध्ये मिळालेले अनुभव हे त्यांच्यासाठी अविस्मरणीय होत जातात आणि त्याचाच धागा पकडून ते आपल्या स्वप्नांना एक प्रकारचं बळ देत राहतात .नवीन नवीन स्वप्नांची दिशा ते ठरवत असतात. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना या स्वप्नांचा आधार मिळतो .या स्वप्नांना पंख देण्याचं काम कोण करत असेल तर ती असते आपली जिल्हा परिषेदीची शाळा. जेव्हा ही शाळा गरुडाप्रमाणे उंच आकाशात उडणाऱ्या ह्या पाखरांकडे पाहते तेव्हा ती आपल्या पंखाखाली असलेल्या पिलांकडे पाहून त्यांना नेहमी सांगत असते.
आनंदाचे गाणे अन् आनंदाचा फळा !
आनंदाचे जगणे आणि आनंदाची शाळा !
पंखात बळ देते मी, उड रे आकाशी माझ्या बाळा …..
पंखात बळ देते मी ,
उड रे आकाशी माझ्या बाळा….
सौ. वैशाली अशोक मिसाळ
पदवीधर शिक्षिका,
जि. प. प्राथमिक शाळा पुसाणे
ता. मावळ, जि. पुणे.