मनसे पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा स्वबळावर लढणार; करेक्ट कार्यक्रम कुणाकुणाचा होणार?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हे प्रशिक्षण शिबीर पार पडले. मनसे स्वतंत्र लढणार असल्याने शहराच्या राजकारणात ट्विस्ट आला आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे तीनही विधानसभा मतदारसंघात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील मनसे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी, भोसरी आणि चिंचवड हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे हे तीनही विधानसभा मतदारसंघ मनसे लढविणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र ऐनवेळी तीनपैकी एक किंवा दोन विधानसभा मतदारसंघही मनसे लढवू शकते. पण सध्या तरी मनसेने तीनही विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पक्षाच्या वतीने तीनही विधानसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात मनसेचे हे प्रशिक्षण शिबीर पार पडले.
मुंबईतील निवडणूक व्यवस्थापक सल्लागार धनंजय खाडिलकर यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदार यादी वाचन कसे करावे, मतदार यादी कशी फोडावी, मतदार नोंदणी कशी करावी, मतदार यादीत दुबार नावे कशी शोधावी, मतदार यादीतील दिशादर्शक, प्रभागाची हद्द, या यादीमध्ये समाविष्ट असलेले मतदार कसे ओळखायचे, मतदार कोणत्या सोसायटीत, भागात राहतात ते कसे ओळखायचे, पक्षाला मानणारे मतदार, वैयक्तिक तुमचे जवळचे मतदार, आपले विरोधातले मतदार कसे ओळखायचे, मतदार यादीवर हरकती कशा घ्यायच्या या व अशा अनेक गोष्टींवर खाडिलकर यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, सचिव रुपेश पटेकर, महिला सेना अध्यक्षा सीमा बेलापूरकर, चिंचवड विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतारासे, भोसरी विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनविसे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, जनहित उपाध्यक्ष राजू भालेराव, मनहित शहराध्यक्ष शैलेश पाटील, संघटक विनोद भंडारी, विष्णू चावरिया जयसिंग भट यांच्यासह इतर पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.