बॅनर न्यूज
महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार महेश लांडगे हे पाप कुठे फेडणार?
भोसरीच्या उड्डाणपुलाखालील ४३ कोटींच्या अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट कामाने घेतला एकाचा जीव

पिंपरी : भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली तब्बल ४३ कोटी रुपये खर्च करून केलेल्या अर्धवट कामामुळे एका नागरिकाने आपला जीव गमावला. महापालिका अधिकारी, ठेकेदार आणि राजकारण्यांनी हे ४३ कोटी रुपये लुटले आहेतच आता या अर्धवट कामांमुळे नागरिकांचा जीव जाण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी या अर्धवट कामांमुळे अनेक अपघात होऊन शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. आता तर नागरिकांवर आपला जीव गमाविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेचे आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट आयुक्त शेखर सिंह आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पाप कुठे फेडणार?, असा सवाल आता भोसरीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अन्य जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भोसरी विधानसभा म्हणजे भ्रष्टाचाराची महागंगा असे समीकरण तयार झालेले आहे. कोणतेही काम घ्या त्यात भ्रष्टाचार दडलेला असतो म्हणजे असतोच हे उघड गुपित आहे. अगदी १०० रुपयांचे काम १० हजार किंवा १ लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याची अनेक उदाहरणे या मतदारसंघातील विकासकामांबाबत देता येतील. भोसरी उड्डाणपुलाखालील सुशोभिकरणाचे काम हे त्यातील एक उदाहरण. अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली भोसरी उड्डाणपुलाखाली विकासकामे हाती घेण्यात आली होती. तब्बल ४३ कोटी रुपये या कामावर खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वास्तवात आता या क्षणी भोसरी उड्डाणपुलाखाली जाऊन पाहणी केल्यास कामाच्या नावखाली ४३ कोटी रुपये कशा पद्धतीने वाटून खाल्ले असतील हे अगदी शाळेत जाणारे लहान मूल सुद्धा सांगू शकेल.
आता भोसरी उड्डाणपुलाखाली ४३ कोटी रुपये खर्चून केलेले हे अर्धवट काम नागरिकांच्या जिवावर उठले आहे. हे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट कठडे आणि त्या सिमेंटमध्ये वापरण्यात आलेले लोखंडी गज बाहेर आलेले आहेत. ४३ कोटी खायला भेटल्यामुळे महापालिका आयुक्त, अधिकारी व राजकारण्यांनी लोकांच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता लोखंडी गज बाहेर आलेला सिमेंटचा कठडा तसाच सोडून दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २६) रात्री एका निष्पाप जिवाचा या कठड्याने बळी घेतला.
भोसरी, गव्हाणे वस्ती येथे राहणारे दिपक बवले (वय ५५) हे या रस्त्याने दुचाकीवरून जात होते. ते मारूती शोरूमजवळ दुचाकी स्लीप झाल्यामुळे अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत अर्धवट सोडलेल्या कामाच्या सिमेंट कठड्यावर जाऊन पडले. त्यामुळे त्या सिमेंट कठड्यामध्ये असलेले लोखंडी गज दिपक बवले यांच्या छातीत आरपार घुसले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ४३ कोटींच्या अर्धवट कामाने एका नागरिकाचा जिव घेतल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात संताप व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह, महापालिकेचे कोणतेही काम मीच केल्याचे सांगणारे आमदार महेश लांडगे हे पाप कुठे फेडणार आहेत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणारे राज्यातील सरकार सुद्धा या घटनेला जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू असताना आणि त्याबाबत राज्य सरकारकडे असंख्य तक्रारी गेलेल्या असतानाही ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री ना अन्य कोणी वरिष्ठ अधिकारी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला राज्य सरकार सुद्धा तितकेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आता शहरातील नागरिकांमध्ये उमटू लागली आहे. भोसरी उड्डाणपुलाखील एका नागरिकाचा जिव गेल्याने याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अन्य जबाबदार अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.