बॅनर न्यूज
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवलेल्या मोशीतील जागेची शिवप्रेमींनी केली साफसफाई
पुतळ्याविषयी खोटी माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर कोणत्या आमदाराचा होता दबाव?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग अत्यंत गलिच्छ जागेत ठेवण्यात आले आहेत. ही बाब पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी उघडकीस आणल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील अनेक शिवप्रेमींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवण्यात आलेल्या जागेवर धाव घेत संपूर्ण परिसराची साफसफाई केली. दरम्यान, या पुतळ्याविषयी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना खोटे सांगितले होते. त्यासाठी त्यांच्यावर कोणत्या आमदाराचा दबाव होता का? याची चौकशी होऊन सत्य समोर यायला हवे, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी, बाऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. गेली चार-पाच वर्षे झाली हे काम सुरूच आहे. दुसरीकडे या कामाच्या खर्चाचा आकडा कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. सुरूवातीला अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी विनायकनगर येथील जागा योग्य नसल्याने तेथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येऊ नये, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र एका आमदाराच्या हट्टापायी त्याच जागेत हा पुतळा उभारण्याचा घाट घालण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासाठी सुमारे ५ ते ६ कोटी रुपये खर्च करून चौथरा उभारल्यानंतर पुन्हा कोट्यवधी रुपये खाण्यासाठी पुतळ्याची जागा बदलण्यात आली.
त्यानुसार मोशी सेक्टर क्रमांक ५ व ८ येथील पीएमआरडीएच्या जागेत हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राच्या जागेत १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे नियोजित आहे. आधी ज्या जागेत हा पुतळा उभारण्यात येणार होता तेथे चौथरा उभारण्याचे काम मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले होते. पुन्हा त्याच ठेकेदाराला पीएमआरडीएच्या जागेत पुतळा उभारण्यासाठी चौथरा बांधण्याचे तब्बल साडेबारा कोटींचे काम देण्यात आले. या ठेकेदाराची एक आमदार आणि आमदाराच्या भावासोबत भागीदारी आहे हे शहरातील सर्व राजकारण्यांना आणि महापालिका प्रशासनाला माहिती आहे. महापालिकेत भाजपची २०१७ मध्ये सत्ता आल्यापासून बहुतांश मोठी कामे याच ठेकेदाराला कशी काय मिळतात यामागचे गुपित हेच आहे की या ठेकेदाराची एका आमदार आणि त्या आमदाराच्या भावासोबत भागीदारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन हा ठेकेदार करीत असला तरी कामाचा सर्व मलिदा एक आमदार आणि त्याच्या भावाला मिळतो हे उघड गुपित असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. सर्वच गोष्टीत भ्रष्टाचार होतो. पण किमान महापुरूषांच्या प्रकरणात तरी भ्रष्टाचार होऊ नये अशी राज्यातील नागरिकांची सर्वसामान्य भावना आहे. मात्र राजकारणी आणि प्रशासनाला कोणतीच लाज उरलेली नसल्यामुळे ते भ्रष्टाचार करण्यासाठी महापुरूषांना देखील सोडत नाहीत, हे आता जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत शहरातील नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही जणांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही शंका खरी ठरली आहे.
पुतळा उभारण्याठी चौथरा बांधण्याच्या कामात सरळसरळ भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असताना आता पुतळ्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाचा भ्रष्ट कारभार उघडा पडला. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो खोटे असून, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ब्रांझ धातूचा उभारण्यात येत असून, त्याचे वेगवेगळे भाग तयार करण्यात आले आहेत. पुतळ्याचे वेगवेगळे भाग जोडल्यानंतर हा पुतळा पूर्ण होणार असून, व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर विश्वास ठेवला होता.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना खोटे सांगितल्याचे सूर्यप्रकाशाइतके सत्य समोर आले. कामठे यांच्या पाहणीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्याचे स्पष्टपणे समोर आले. जर पुतळा ब्रांझ धातूचा आहे, तर जमीनीवर ठेवलेल्या मोजडीला तडा कसा काय गेला याचे उत्तर आता आयुक्त शेखर सिंह यांना द्यावे लागणार आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पुतळ्याचे वेगवेगळे भाग अत्यंत गलिच्छ जागेत ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी असलेल्या लेबर कॅम्पमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या जागेत पुतळ्याचे भाग पडलेले होते. तसेच तेथे झाडेझुडपे वाढली होती. ही बाब तुषार कामठे यांच्यामुळे समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील अनेक शिवप्रेमींनी पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवलेल्या ठिकाणी धाव घेत संपूर्ण जागेची स्वच्छता केली. त्यामध्ये स्वतः कामठे देखील सहभागी झाले.
दरम्यान, याप्रकरणात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना खोटे बोलण्याची गरज का पडली, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचीच नाही तर अखंड हिंदू धर्माची अस्मिता असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट केले जात असताना त्याबाबत खोटी माहिती देण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर कोणाचा दबाव आला होता, याची आता चौकशी होण्याची आवश्यकता आहे. तसेच या पुतळ्यासाठी ६० कोटींहून अधिक खर्च केले जात असताना अखंड हिंदूस्थानाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग ठेवण्यासाठी गोडाऊन का तयार करण्यात आलेले नाही, हा देखील प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे. हे ६० कोटी फक्त ठेकेदार आणि त्याच्याशी भागीदारी असलेल्या आमदार व त्याच्या भावाला खाण्यासाठी महापालिका मोजणार आहे का?, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्य आणि वस्तुस्थिती समोर न आणता खोटी माहिती देणाऱ्या आयुक्तांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकर करीत आहेत.