बॅनर न्यूज
पिंपरीतील शगुन चौकात भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्यासाठी स्वाक्षरी अभियान
मनोज गरबडे यांनी पुढाकार घेत राबविलेल्या अभियानाला सिंधी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी येथील शगुन चौकाचे “झुलेलाल चौक” असे नामकरण करावे. या चौकात भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज गरबडे यांनी शनिवारी स्वाक्षरी अभियान राबविले. शहरातील सिंधी समाज बांधवांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने या समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांची मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज गरबडे यांनी दिला आहे.
पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील शगुन चौक हा नावाजलेला चौक आहे. या चौकाचे झुलेलाल चौक असे नामकरण करून त्याठिकाणी भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी शहरातील सिंधी समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही मागणी मान्य केली होती. तसेच चौकाच्या नामकरणाचा ठराव देखील मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने १० फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिकेने भूमीपूजनाचा कार्यक्रम देखील पार पाडला होता.
त्यानंतर दोन-अडीच वर्षे झाले तरी हे काम भूमीपूजनावरच थांबलेले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील करदात्यांकडून वेळेत कर वसूल करते. मात्र एखाद्या कामाचे भूमीपूजन करून दोन-अडीच वर्षे होऊनही कामाला सुरूवात करीत नसल्याने सिंधी समाज बांधवांमध्ये नाराजीची भावना आहे. या समाज बांधवांच्या नाराजीला वाचा फोडण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते मनोज गरबडे यांनी केले आहे. शगुन चौकाचे झुलेलाल चौक नामकरण आणि त्याठिकाणी भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी मनोज गरबडे यांनी शनिवारी शगुन चौकात स्वाक्षरी अभियान राबविले.
शहरातील सिंधी समाज बांधवांनी या स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होत झुलेलाल चौक नामकरण आणि भगवान झुलेलाल यांचा पुतळा बसविण्यासाठी स्वाक्षरी केली. तसेच महापालिकेच्या ढिम्म कारभाराबाबत संताप व्यक्त करून मनोज गरबडे यांच्या या सामाजिक कामाचे सिंधी समाज बांधवांनी कौतुक केले. शहरातील एकाही राजकीय नेत्याने सिंधी समाज बांधवांच्या भावना आणि आस्था विचारात घेऊन शगुन चौकाचे झुलेलाल चौक नामकरण करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र सामाजिक कार्यकर्ते मनोज गरबडे यांनी पुढाकार घेत सिंधी समाज बांधवांच्या भावना लक्षात घेत महापालिकेला जागे करण्याचे काम केल्याबद्दल अनेक सिंधी समाज बांधवांनी मनोज गरबडे यांचे मनापासून आभार मानले.
शगुन चौकाच्या नामकरणासाठी महापालिकेला केवळ जागे करण्याच्या उद्देशाने आता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले आहे. सिंधी समाज बांधवांच्या या मागणीची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत शगुन चौकाचे झुलेलाल चौक नामकरण करून तेथे भगवान झुलेलाल यांचा पुतळा न बसविल्यास या समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज गरबडे यांनी दिला आहे.