बॅनर न्यूज

भ्रष्टाचार करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा न सोडणाऱ्या प्रवृत्ती विरोधात सोमवारी पिंपरीत भीक मांगो आंदोलन

Spread the love
पिंपरी : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या सोमवारी ९ सप्टेंबर २०२४ रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत समन्वयक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामात प्रचंड अनागोंदी होत असल्याची माहिती नुकतीच महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांनी उघडकीस आणली. पुतळा उभारणीचे काम प्राथमिक अवस्थेत असताना संभाजी महाराजांच्या ‘मोजडी’ला तडे गेल्याचे समोर आले. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. यामुळे शहराच्या लौकिकाला देखील तडा गेला आहे.
अशा प्रकारचा सत्ताधाऱ्यांचा मस्तवाल कारभार थांबवण्यासाठी आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी येथील भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली जाईल.  पिंपरी चौकातून राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन देखील करणार असल्याचे मानव कांबळे यांनी सांगितले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिक तसेच शिवशंभू प्रेमी संघटनांनी सहभागी व्हावे, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button