बॅनर न्यूज
मोशीतील संभाजी महाराज पुतळा विटंबनेप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
संभाजी ब्रिगेडची राज्यपाल, मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
महापालिकेमार्फत मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा दिल्ली येथे तयार करून त्याचे वेगवेगळे भाग मोशी येथील एका मोकळ्या जागेत आणून ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी पुतळ्याच्या मोजडीला तडा गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनेक सुटे भाग सांडपाणी युक्त गवत व झुडपांनी व्यापलेल्या जागेत ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होत आहे. नियोजित पुतळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी या पुतळ्याचे दिल्लीवरून आणलेले वेगवेगळे भाग संरक्षित जागेत ठेवण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुतळ्याच्या कामाचे ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, मूर्तिकार राम सुतार, सल्लागार क्रिएशन कन्सल्टन्सी, शहर अभियंता मकरंद निकम, तत्कालिन कार्यकारी अभियंता संजय घुबे, विद्यमान कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांची होती.
मात्र हे सर्वजण केवळ पैसे खाण्यात मग्न आहेत. प्रत्येक कामात खाताना महापुरूषांना सुद्धा सोडायचे नाही असाच या सर्वांचा कारभार सुरू आहे. प्रत्येक बाब खाण्यासाठीच असते अशी धारणा झालेले आयुक्त शेखर सिंह यांच्या कारभारामुळे संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. त्यामुळे या पुतळा विटंबनेस कारणीभूत ठरलेले महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुतळ्याच्या कामाचे ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, मूर्तिकार राम सुतार, सल्लागार क्रिएशन कन्सल्टन्सी, शहर अभियंता मकरंद निकम, तत्कालिन कार्यकारी अभियंता संजय घुबे, विद्यमान कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडने राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनावर शहराध्यक्ष सतीश काळे, जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष लहू लांडगे, जिल्हा सचिव गणेश कुंजीर, शहर सचिव रावसाहेब गंगाधरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.