बॅनर न्यूज

सगळीकडे नुसता भ्रष्टाचार; बड्या बिल्डरांना केलेला १० कोटींचा दंड मावळ-मुळशीच्या प्रांताधिकाऱ्याकडून रद्द

अपना वतन संघटनेने अधिकाऱ्यांची नोटतुला करत केले अनोखे आंदोलन

Spread the love

पिंपरी : अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी बड्या बिल्डरांना केलेला तब्बल १० कोटींचा दंड रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार अपना वतन संघटनेने उघडकीस आणला आहे. मावळ- मुळशीचे तत्कालिन प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार व नायब सहसीलदारांनी हा प्रताप केला आहे. सर्वसामान्यांऐवजी बिल्डरांसाठी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ अपना वतन संघटनेने प्रांताधिकाऱ्यांची नोटतुला हे अनोखे आंदोलन केले. 

पिंपरी-चिचंवड, मावळ व मुळशी कार्यक्षेत्रामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. असाच एक प्रकार अपना वतन संघटनेने उघडकीस आणला आहे. सोनिगरा रिअलकॉन, क्रिसला इन्फोकोन, व्हीटीपी रियालिटी या बांधकाम कंपन्यांनी विनापरवाना गौणखनिज उत्खनन केल्याचे पुराव्यासह समोर आणले. त्यानंतर अपना वतन संघटनेच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत या बड्या बिल्डरांना तब्बल १० कोटींचा दंड लावण्यात आला होता. परंतु, बिल्डरांच्या घरचे पाणी भरणारे मुळशीचे तत्कालीन प्रांताधिकारी संदेश शिर्के, मुळशीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी बिल्डरांना लावण्यात आलेला हा १० कोटींचा दंड चक्क रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही बाब समोर येताच अपना वतन संघटनेच्या वतीने बावधन येथील कार्यालयासमोर  प्रांताधिकाऱ्यांची नोटतुला हे अनोखे आंदोलन केले. एका तराजूमध्ये प्रांताधिकारी संदेश शिर्के यांची प्रतिमा  ठेऊन दुसऱ्या बाजूला ५०० च्या नोटांचे बंडल ठेवण्यात आले. अशा प्रकारे प्रांताधिकाऱ्यांची नोटतुला करीत अपना वतन संघटनेने भ्रष्टाचाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी महसूल बुडवण्यास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणात पुनरावलोकनासाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर प्रकरणात उपजिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याची खात्री त्यांनी दिली.

या अनोख्या आंदोलनात अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, राज्य संघटक हमीद शेख , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, शहर संघटक गणेश जगताप, शिवशाही व्यापारी संघटनेचे युवराज दाखले, आरपीआय (आठवले गट) राज्य संघटक कैलास जोगदंड, रिपब्लिकन सेनेचे दत्ता गायकवाड, युवा वादळ संघटनेचे युवराज भास्कर, तौफिक पठाण, वासिम पठाण, मलंग शेख, बाळासाहेब वाघमारे, रऊफ शेख, संतोष सुतार, कयूम पठाण, विकास पांडागळे, दीपक जाधव, युवा नेते प्रमोद शिंदे, अमोल सावदेकर, अमोल उबाळे, मछिंद्र गायकवाड, दादासाहेब ढवळे आदी सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button