बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट; महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी थेट ठाकरे-पवारांना कोट्यवधी देण्याची तयारी?

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात महाविकास आघाडीचे पारडे दिवसेंदिवस जड होतानाचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शहराच्या राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डरांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. विधानसभेच्या तिकीटासाठी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आम्ही कितीही कोटी द्यायला तयार आहोत, अशी भाषा या ठेकेदार आणि बिल्डरांकडून खासगीत केली जात आहे. तसेच तिकीटासाठी मध्यस्थी करणाऱ्यांना महागातील महाग गाडी भेट देण्याची तयारी सुद्धा त्यांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून शहराच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार झाडून कामाला लागले आहेत. शहरात तीन विधानभा मतदारसंघ असून, तीनही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीपर्यंत शहरात महायुतीचे पारडे जड वाटत होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक राजकीय वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरात सुद्धा दिवसेंदिवस महाविकास आघाडीचे पारडे जड होत आहे. अनेक चांगले आणि नव्या दमाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीत आले आहेत. मात्र आता महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेत आमदार होण्यासाठी शहराच्या राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डर पिंपरी-चिंचवडपासून ते मुंबईपर्यंत सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळावी यासाठी राजकारणातील हे ठेकेदार आणि बिल्डर वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार झाल्याचे सांगितले जात आहे. थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आम्ही तिकीटासाठी कितीही कोटी देण्यास तयार आहोत, अशी भाषा त्यांच्याकडून खासगीत बोलताना केली जात आहे. एवढेच नाही तर तिकीटासाठी मध्यस्थी करण्यास तयार असलेल्या दलालांना महागातील महाग गाडी भेट देण्याची तयारी सुद्धा त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. राजकारणातील या ठेकेदार आणि बिल्डरांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी वाटेल त्या सुरू असलेल्या हालचाली शहराच्या राजकीय वर्तुळात लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. या दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटावा आणि येथून भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांना मशाल चिन्हाचे तिकीट मिळावे यासाठी शहराच्या राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डर प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सीमा सावळे यांच्यासाठी पिंपरी कॅम्पमधील एक बडा बिल्डर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश बदल यांच्याकडून मातोश्रीवर फिल्डिंग लावण्यात येत असल्याची चर्चा आहे. योगेश बहल हे स्वतः बिल्डर आहेत. त्यांचे अनेक नातेवाईक महापालिकेत ठेकेदार आहेत. सीमा सावळे यांचेही नातेवाईक महापालिकेत ठेकेदार आहेत. याशिवाय सीमा सावळे यांचे राजकीय गुरू आणि सर्वकाही असलेले सारंग कामतेकर हे बिल्डर आहेत. ते भाजपचे माजी पदाधिकारी सुद्धा होते. त्याचप्रमाणे सारंग कामतेकर यांचा मुलगा, मेहुणा आणि अन्य काही नातेवाईक हे महापालिकेचे ठेकेदार आहेत. या सर्वांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. करदात्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केल्याचे उघड गुपित आहे.
या सर्वांची महापालिकेत मोठी राजकीय दुकानदारी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता सीमा सावळे आमदार झाल्या, तर या सर्वांचा महापालिकेतील धंदा तेजीत सुरू राहील. एका बाईच्या पदराआड लपून शहरातील करदात्यांना आणखी लुटता येईल, असे या सर्वांचे मनसुबे आहेत. सीमा सावळे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी या सर्वांची थेट उद्धव ठाकरे यांना कोट्यवधी रुपये देण्याची तयारी असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेनेने दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीरंग बारणे यांच्याकडून २० कोटी रुपये घेऊन गजानन बाबर यांचे तिकीट कापल्याचा जाहीर आरोप सीमा सावळे यांचे राजकीय गुरू व सर्वस्व असलेले सारंग कामतेकर यांनी केला होता. आता तीच निती वापरून उद्धव ठाकरे यांना कितीही कोटी रुपये देऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचा राजकारणातील या ठेकेदार आणि बिल्डरांचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
तीच परिस्थिती भोसरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भोसरी विधानसभा मतदारसंघ लढविल्यास तेथे विजय मिळेल, अशी राजकीय स्थिती आहे. परंतु, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कसा सुटेल यासाठी शहराच्या राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डर प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे इच्छुक आहेत. सध्या अजित गव्हाणे हे सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार चालत असल्याचे बोलले जाते. अजित गव्हाणे हे सुद्धा स्वतः बिल्डर आहेत. त्यामुळे सीमा सावळे, सारंग कामतेकर, अजित गव्हाणे हे सर्वजण एकाच माळेचे मणी असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी डिपॉझीट जप्त झालेले राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे. खासदार कोल्हे आणि कलाटे यांच्या या राजकीय संबंधाविषयी “ये रिश्ता क्या कहलाता है”, अशी प्रतिक्रिया शहराच्या राजकारणात उमटत आहे.
आता महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाची चर्चा मुंबईत सुरू आहेत. अशावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील जागा वाटपाबाबत राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डरांनी घेतलेल्या पुढाराने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हे असेच होणार असेल तर मग आम्ही पक्षाचे काम करून तरी काय फायदा आहे. पक्षाच्या वरिष्ठांना राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डरच जवळचे वाटत असतील तर आम्हाला शेवटचा आणि टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. तिकीटासाठी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच कोट्यवधी रुपये देण्याची या ठेकेदार आणि बिल्डर असलेल्या राजकारण्यांची हिंमत असेल तर आम्ही कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला असून, तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी राजकारणातील ठेकेदार आणि बिल्डरांना मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.